नागपूर : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष या निवडणुकीची जोमाने तयारी करत आहेत. प्रत्येक जागेसाठी सक्षम उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. तर दुसरीकडे राज्यातील वेगवेगळे नेते तिकीट मिळवण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावत आहेत. अशा स्थितीत आता आमदार अनिल देशमुख यांचा काटोल हा मतदारसंघ चर्चेत आला आहे. या मतदारसंघात देशमुख हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच आता येथे नवा ट्विस्ट आला आहे. येथे देशमुख यांना महाविकास आघाडीतूनच आव्हान मिळण्याची शक्यता आहे. 


अनिल देशमुख यांना तगडं आव्हान


राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांना त्यांच्या काटोल मतदारसंघातच तगडं आव्हान मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हे आव्हान महायुतीतून नव्हे, तर महाविकास आघाडीतूनच  मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे युवा नेते याज्ञवलक्य जिचकार यांनी काटोल मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे आता काटोल मतदारसंघात महाविकास आघाडीत नवा पेच निर्माण झाले आहे.


आता थेट सिस्टममध्ये उतरुन लोकांची कामं करणार 


याज्ञवलक्य जिचकार हे काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते डॉ. श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र आहेत. ते मुळचे याच मतदारसंघातील आहेत. काटोल फक्त माझ्या वडिलांचा जुना मतदारसंघ नाही. काटोलच्या मातीशी आमचं नातं आहे. काटोल मतदारसंघात आजवर जे काही होणे अपेक्षित होते, ते होऊ शकलेले नाही. सामाजिक क्षेत्रातून लोकांची कामं करताना अनेक मर्यादा असतात. त्यामुळे आता थेट सिस्टममध्ये उतरुन लोकांचे काम करण्याचे ठरवले आहे असे, याज्ञवलक्य जिचकार म्हणाले. काटोल मतदारसंघ यंदा काँग्रेसच्या वाट्याला येईल आणि मला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षाही याज्ञवलक्य जिचकार यांनी व्यक्त केली. 


महाविकास आघाडीतून कोणाला तिकीट मिळणार?


दरम्यान, काटोल मतदारसंघ पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला  सुटल्यास कार्यकर्त्यांशी बोलून वेगळा निर्णय घेऊ. हा निर्णय तुम्हाला कळवू असे सूचक वक्तव्य करून याज्ञवलक्य जिचकार यांनी आता माघार नाही असेच संकेत दिले आहेत. त्यामुळे आता काटोल या मतदारसंघात भविष्यात नेमकं काय घडणार? महाविकास आघाडीकडून या जागेसाठी कोणला संधी मिळणार? याची उत्सुकता आता लगली आहे. विशेष म्हणजे अनिल देशमुख यांना तिकीट मिळालेच तर जिचकार यांची ते मनधरणी कशी करणार? हेही पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


हेही वाचा :


Girish Mahajan : अनिल देशमुख यांची आणि माझी नार्को टेस्ट करा; गिरीश महाजन यांचे थेट आव्हान, म्हणाले....