Girish Mahajan पुणे: भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर करण्यात आलेला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना खोट्या गुन्ह्यात अडवण्यात आल्याचा आरोप करत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 


दरम्यान याच मुद्याला घेऊन आता अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप गिरीश महाजन यांनी फेटळले आहे. तर अनिल देशमुख यांची आणि माझी नार्को टेस्ट करा, असे थेट आव्हान गिरीश महाजन यांनी अनिल देशमुखांना दिले आहे आहे.


अनिल देशमुखांना  गिरीश महाजन यांचे थेट आव्हान 


अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना त्यांनी अनेक कारनामे केले आहे. आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करीत आहेत. चार वर्षानंतर खोटे गुन्हे दाखल करायचे, आमच्यावर मोक्का लावायचा, अशा पद्धतीचे काम अनिल देशमुख यांनी केल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे. अनिल देशमुख यांनी माझ्यासमोर येऊन समोरासमोर बोलावे किंवा त्यांची आणि माझी नार्को टेस्ट करण्यात यावी,  त्याला सामोरे जाण्यास मी तयार असल्याचे सांगत, गिरीश महाजन यांनी अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.   


अमित शाह यांच्या दौऱ्यात जागा वाटपाबाबत कुठलीही चर्चा नाही 


अमित शहा यांच्या दौऱ्यात जागा वाटपाबाबत कुठलीही चर्चा झालेली नसून तीनही पक्षाचे नेते बसून याबाबत योग्य तो निर्णय घेत आहेत.  या सोबतच आमच्या सोबत असलेले इतर लहान घटक पक्षाने देखील सोबत घेऊन आम्ही विधानसभेच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. तसेच मोठ्या मताधिक्यांनी महायुती विधानसभेच्या निवडणुकीत विजय होईल, असा विश्वासही गिरीश महाजन यांनी यावेळी व्यक्त केलाय. महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण सुरू झाले असून ते न करता विकासाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. जे सरकार आपल्या भागाचा विकास करीत आहे, त्यांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे आणि जातीपातीचे राजकारण थांबवले पाहिजे, असे म्हणत गिरीश महाजन यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवली आहे. बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करावा, अशी चर्चा अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत झाली असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. गिरीश महाजन यांनी अशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले आहे. 


हे ही वाचा