सिंधुदुर्ग: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आपल्याला लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील बड्या नेत्याने पंतप्रधानपदाची ऑफर (PM Post Offer) दिली होती, असे वक्तव्य करत राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपमधील (BJP) कोणत्याही नेत्याने प्रतिक्रिया दिली नव्हती. एकूण भाजपच्या नेत्यांनी काहीशी सावध भूमिका घेतली होती. मात्र, भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी नितीन गडकरी यांच्या या वक्तव्यावर भाष्य केले आहे. ते रविवारी सिंधुदुर्गात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
नितीन गडकरी हे मोठे नेते आणि माझे मित्र आहेत. त्यांनी पंतप्रधानपदाच्या ऑफरबाबत केलेले वक्तव्य राजकीय की वैयक्तिक हे मला माहीत नाही. मी त्या विषयावर बोलणार नाही, अशी मोघम प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली. त्यानंतर राणे यांनी या विषयावर फारसे बोलण्यास नकार दिला. एकूणच नारायण राणे यांनी भाजपच्या इतर नेत्यांप्रमाणेच सावधानतेचे धोरण स्वीकारल्याचे दिसत आहे.
गेल्या दहा वर्षांमध्ये नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पंतप्रधानपदाचा पर्यायी चेहरा म्हणून भाजपमध्ये कोणतेही नेतृ्त्त्व उदयाला आले नव्हते. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर मित्रपक्षांच्या कुबड्यांचा आधार घेऊन नरेंद्र मोदी यांना सरकार स्थापन करावे लागले. त्यामुळे आता भाजपमधील अंतर्गत परिस्थिती बदलेल, अशी चर्चा होती. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांचे वक्तव्य अनेक अर्थांनी महत्त्वाचे मानले जात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा किस्सा नितीन गडकरी यांनी नेमका आताच सांगून अचूक राजकीय टायमिंग साधले आहे का, अशी चर्चा सुरु झाली आहे.
नरेंद्र मोदी यांच्यानंतर देशाचा पंतप्रधान कोण होऊ शकते, याची चर्चा अधुनमधून सुरु असते. या शर्यतीमध्ये योगी आदित्यनाथ आणि अमित शाह यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र, आता नितीन गडकरी यांच्या वक्तव्यामुळे भावी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आणखी एक तगड्या चेहऱ्याची भर पडली आहे.
नितीन गडकरी यांनी नेमके काय म्हटले?
नितीन गडकरी यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांना देण्यात आलेल्या पंतप्रधानपदाच्या ऑफरबाबत गौप्यस्फोट केला होता. त्यांनी म्हटले होते की, काही दिवसांपूर्वी एक घटना अचानक घडली. मी या घटनेमधील नेत्याचे नाव सांगत नाही. पण त्याने मला सांगितले होते की, तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. पण त्यावर मी त्यांना विचारलं की, तुम्ही मला पंतप्रधानपदासाठी का पाठिंबा देणार आहात आणि मी तो पाठिंबा का घ्यावा? मी संबंधित नेत्याला स्पष्टपणे सांगितले की, पंतप्रधानपद हे माझ्या आयुष्यातील ध्येय नाही. मी माझ्या तत्वांशी आणि पक्षसंघटनेशी एकनिष्ठ आहे. मी पंतप्रधानपदासाठी या तत्त्वांशी आणि पक्षाशी प्रतारण करणार नाही. ही तत्त्वं हीच भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे, असे नितीन गडकरी यांनी म्हटले.
आणखी वाचा