मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे. कारण महायुतीने दिलेले सर्व 9 उमेदवार निवडून आले आहेत. महाविकास आघाडीचे 3 पैकी दोन उमेदवार विजयी झाले. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनी 26 मतांसह बाजी मारली तर मिलिंद नार्वेकर यांनी पहिल्या फेरीत 22 मतं मिळवत विजयाचा उंबरठा गाठला होता, पण तो उंबरठा पार करण्यासाठी त्यांना दुसऱ्या फेरीची वाट पाहावी लागली. पण चुरशीच्या लढाईत त्यांनी विजय मिळवलाच. विधानपरिषद निवडणुकीत (Vidhanparishad Election 2024) विजयी होण्यासाठी 23 मतांचा कोटा होता. महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर लढणारे शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला. जयंत पाटील हे अनेक वर्षे विधानपरिषदेत आमदार होते. मात्र, आजच्या पराभवामुळे त्यांच्या विजयाची परंपरा खंडित झाली आहे.

चार वाजता एकूण 274 आमदारांचे मतदान पूर्ण झाले. यानंतर निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन साधारण पावणेसहाच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाली. विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच फेरीत ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर, भाजपचे योगेश टिळेकर आणि काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनी आघाडी घेतल्याचे दिसले. यावेळी भाजपच्या अमित गोरखे यांच्या मतपत्रिकेवर इंग्रजी आकडा चुकीच्या पद्धतीने लिहल्यामुळे हे वाद निर्माण झाला. तर आणखी एका मतपत्रिकेवर दोन उमेदवारांना पहिल्याच पसंतीचे मत दिल्याने हे मत बाद ठरवण्यात आले. 


सर्वप्रथम भाजपच्या योगेश टिळेकर यांनी विजय मिळवला. त्यानंतर काहीवेळातच भाजपचे अमित गोरखे यांचा विजय झाला. यानंतर सगळ्यांना प्रतीक्षा असलेला निकाल जाहीर झाला. गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर असलेल्या पंकजा मुंडे यांचा विजय झाला. त्यामुळे पंकजा मुंडे यांची महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एन्ट्री झाली आहे. याशिवाय, पुढील काही मिनिटांमध्ये भाजपच्या परिणय फुके आणि रयत क्रांती पक्षाचे सदाभाऊ खोत हेदेखील विजयी झाले. पहिल्या तासभरातच महायुतीने दावा केल्याप्रमाणे भाजप, अजितदादा गट आणि शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे महायुतीच्या गोटात जल्लोषाचे वातावरण होते.


कोणकोणते उमेदवार विजयी? 


भाजपचे विजयी उमदेवार


1) योगेश टिळेकर - 26 मते
2) पंकजा मुंडे - 26 मते
3) परिणय फुके- 26 मते
4) अमित गोरखे - 26 मते
5) सदाभाऊ खोत - 24


एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार

1) भावना गवळी - 
2) कृपाल तुमाने


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)


1. शिवाजीराव गर्जे
2. राजेश विटेकर


काँग्रेस विजयी उमेदवार

1) प्रज्ञा सातव - 26

शिवसेना ठाकरे गट

मिलिंद नार्वेकर


आणखी वाचा


मोठी बातमी : अजित पवारांचे दोन्ही उमेदवार जिंकले, शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर विजयी


अखेर पंकजा मुंडे आमदार बनल्या, 10 वर्षांनी उधळला विजयाचा गुलाल; विधानपरिषद निवडणुकीत किती मतं मिळाली?