मुंबई: गेल्यावर्षी शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात सामील झालेल्या मनीषा कायंदे (manisha kayande) यांची पुन्हा विधानपरिषदेवर निवडून जाण्याची इच्छा अपुरीच राहिली आहे. कारण, येत्या 12 तारखेला होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीत (Vidhanparishad Election 2024) शिंदे गटाच्या वाट्याला आलेल्या दोन जागांवरुन एकनाथ शिंदे यांनी भावना गवळी (Bhavana Gawali) आणि कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांना उमेदवारी दिली आहे. या दोघांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली नव्हती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी दोन्ही नेत्यांना विधानपरिषदेची उमदेवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले आहे आणि आपला शब्दही पाळला आहे. मात्र, यामुळे पुन्हा विधानपरिषदेवर जाण्याची इच्छा असलेल्या मनीषा कायंदे यांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. 


2012 साली डॉ. कायंदेंनी भाजपला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर गेल्यावर्षी उद्धव ठाकरेंची साथ सोडून त्या एकनाथ शिंदेंच्या गटात गेल्या होत्या. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर 2018 साली उद्धव ठाकरे यांनी मनीषा कायंदे यांना विधानपरिषदेवर पाठवले होते. विधानपरिषदेतील कार्यकाळ संपल्यानंतर कायंदे यांना पुन्हा विधानपरिषदेवर संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. किंबहुना हेच गणित ध्यानात ठेवून मनीषा कायंदे यांनी वर्षभरापूर्वी शिंदे गटात प्रवेश केल्याची चर्चा होती. मात्र, कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांच्यामुळे मनीषा कायंदे यांचे गणित बिघडल्याचे सांगितले जाते.


एकनाथ शिंदेंचा पक्षात वेगळा मेसेज


लोकसभा निवडणुकीत भाजपच्या दबावामुळे यवतमाळ-वाशीममधून भावना गवळी आणि रामटेकमधून कृपाल तुमाने या दोघांना एकनाथ शिंदे हे उमेदवारी देऊ शकले नव्हते. तेव्हा एकनाथ शिंदे यांन दोन्ही नेत्यांना विधानपरिषदेत संधी देण्याचा शब्द दिला होता. हा शब्द एकनाथ शिंदे यांनी पाळला आहे. या दोघांना विधानपरिषदेवर संधी देऊन एकनाथ शिंदे यांनी पक्षातही योग्य तो संदेश दिल्याचे सांगितले जाते.


विधानपरिषद निवडणुकीत कोणाकोणाला संधी


विधान परिषदेच्या 11 सदस्यांची मुदत 27 जुलै रोजी संपत आहे. या रिक्त होऊ घातलेल्या जागांसाठी 12 जुलैला मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपच्या पाच, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी दोन, तर काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येकी एक उमेदवाराने उमेदवारी या दिवशी अर्ज दाखल केला. त्यामुळे आता एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी कोणत्या एका उमेदवाराचा पत्ता कट होणार, हे पाहावे लागेल. 


पंकजा मुंडे (भाजप)
परिणत फुके (भाजप) 
सदाभाऊ खोत (भाजप)
अमित गोरखे (भाजप)
योगेश टिळेकर (भाजप)
भावना गवळी (शिंदे गट)
कृपाल तुमाने (शिंदे गट) 
प्रज्ञा सातव (काँग्रेस)
जयंत पाटील (शेकाप)
मिलिंद नार्वेकर (ठाकरे गट)
शिवाजीराव गर्जे (अजितदादा गट)
राजेश विटेकर (अजितदादा गट)


आणखी वाचा


विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच मिलिंद नार्वेकरांमध्ये जुना उत्साह संचारला, फ्लोअर मॅनेजमेंटसाठी कामाला लागले, प्रवीण दरेकरांना कोपऱ्यात घेऊन गेले अन्...