मुंबई: एकेकाळी उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासातील व्यक्ती आणि त्यांचा 'राईट हँड' अशी ओळख असलेले मिलिंद नार्वेकर हे आता विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडून विधानपरिषेदच्या 11 व्या जागेवर उमेदवार उभा करण्यासाठी हिरवा कंदील मिळाल्यानंतर मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी मंगळवारी विधानभवनात येऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे आणि मविआचे इतर नेतेही उपस्थित होते. मविआकडे असलेल्या आमदारांच्या संख्याबळाच्या जोरावर फक्त दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. तिसऱ्या उमेदवाराला निवडून यायचे असल्यास पाच ते सहा मतं कमी पडत आहेत. याच तिसऱ्या जागेवरुन उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकर यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे विधानपरिषदेचा उमेदवारी अर्ज (Vidhanparishad Election 2024) भरल्यानंतर मिलिंद नार्वेकर लगेचच कामाला लागले.


काहीवेळापूर्वीच विधानभवनात मिलिंद नार्वेकर यांनी भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याची माहिती समोर आली आहे. मिलिंद नार्वेकर आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओत मिलिंद नार्वेकर आणि प्रवीण दरेकर (Pravin Darekar) विधानभवनात एका कोपऱ्यात जाऊन बोलताना दिसत आहेत. अगदी जन्मजन्मांतरीचे सख्य असल्याप्रमाणे दोन्ही नेते एकमेकांच्या गळ्यात हात टाकून काहीतरी गुप्त खलबतं करताना व्हीडिओत स्पष्टपणे दिसत आहे. याशिवाय, मिलिंद नार्वेकर यांनी विधानभवनात भाजप आमदार आशिष शेलार यांची भेट घेतल्याचेही सांगितले जाते.  त्यामुळे आता मिलिंद नार्वेकर हे कोणकोणत्या आमदारांची मदत घेऊन विधानपरिषदेच्या 11व्या जागेवरुन निवडून येण्याचा चमत्कार करुन दाखवणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 


एकेकाळी शिवसेनेत मिलिंद नार्वेकर यांचे बडे प्रस्थ होते. मिलिंद नार्वेकर यांना ओलांडल्याशिवाय उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचता येत नव्हते. याशिवाय, एखाद्या निवडणुकीत फ्लोअर मॅनेजमेंट किंवा मतांची जुळवाजुळव करण्याचाही मिलिंद नार्वेकर यांना बऱ्यापैकी अनुभव आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारची स्थापना आणि त्यानंतर शिवसेना पक्षातील फूट या घडामोडींदरम्यान मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांच्यापासून काहीसे दुरावल्याची चर्चा होती. मध्यंतरीच्या काळात त्यांची शिंदे गटाशी जवळीक वाढल्याचेही सांगितले जात होते. त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांच्याभोवती संशयाचे धुके निर्माण झाले होते. परिणामी पक्षसंघटनेत मिलिंद नार्वेकर हे काहीसे बाजूला पडले होते. मात्र, विधानपरिषद निवडणुकीच्यानिमित्ताने मिलिंद नार्वेकर यांच्यात पुन्हा एकदा नवा उत्साह संचारला आहे. 


आणखी वाचा


विधानपरिषदेच्या सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार? भाजपकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे आणि निरंजन डावखरेंच्या नावांची चर्चा