मुंबई: देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: जातीने पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केलेल्या आणि त्यानंतर ईडीची वक्रदृष्टी वळून काही काळ तुरुंगवास भोगावा लागलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर आता पक्षाची मेहेरनजर झाली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीने आतापर्यंत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विरोधामुळे नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यापासून सुरक्षित अंतर राखले होते. मात्र, मंगळवारी रात्री मुंबईतील अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर पार पडलेल्या बैठकीला नवाब मलिक उपस्थित असल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या होत्या. 


गेल्यावर्षीच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी नवाब मलिक ईडीच्या कोठडीतून बाहेर आले होते. सभागृहात आल्यानंतर ते सत्ताधारी बाकांवर बसले होते. या माध्यमातून त्यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजितदादा गटासोबत असल्याचा संदेश दिला होता. परंतु, त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांना तात्काळ जाहीर पत्र लिहून नवाब मलिक यांच्या सत्ताधारी गटातील समावेशाबाबत नाराजी व्यक्त केली होती. नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे योग्य ठरणार नाही, असे फडणवीस यांनी म्हटले होते. त्यानंतर नवाब मलिक हे उर्वरित दिवस अधिवेशनात दिसले नव्हते. अजित पवार यांनीही नवाब मलिक हे राष्ट्रवादीतील नेमक्या कोणत्या गटासोबत आहेत, याबाबत मला कल्पना नसल्याचे म्हटले होते. एकूणच फडणवीस यांच्या दबावामुळेच अजितदादांना आपल्या एका सहकाऱ्याला अंतर द्यावे लागल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काल नवाब मलिक यांची अजितदादांच्या बैठकीला असलेली उपस्थिती सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.


गेल्या अनेक दिवस मलिक यांच्या कार्यालयाकडून नवाब मलिक तटस्थ असल्याचा दावा केला जात होता. विधान परिषद निवडणुकीपूर्वी मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बैठकीला उपस्थिती लावल्याने अजित पवार यांना नवाब मलिक यांनी पाठींबा दिल्याची चर्चा आता रंगली आहे.


अजितदादांनी फडणवीसांचा दबाव झुगारला


देवेंद्र फडणवीस यांचा दबाव झुगारून अजित पवार यांच्या बैठकीला नवाब मलिक यांची हजेरी लावल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत नवाब मलिक हे रामराजे नाईक निंबाळकर आणि हसन मुश्रीफ यांच्या बाजूला बसलेले दिसत आहेत. बैठकीचे निमंत्रण आल्यामुळे नवाब मलिक याठिकाणी उपस्थित राहिल्याचे समजते. 


देवेंद्र फडणवीस यांनी या आधीच नवाब मलिक यांच्यावर ज्या प्रकारचे आरोप आहेत त्यावरून त्यांना महायुतीत सहभागी करुन घेण्यास अडचणी असल्याचे स्पष्ट केले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवाब मलिक यांच्याशी फारकत घेतल्याचे पाहायला मिळाले होते.


आणखी वाचा


अजितदादांच्या मुखात तुकोबा आले, लोकसभेचा परिणाम झालेला दिसतोय, जयंत पाटलांचा टोला