सातारा : लोकसभा निवडणुकीत 2019 मध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा साताऱ्यातून उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी निवडणूक लढवली. मात्र, यंदाच्या निवडणुकीतही सातारा लोकसभा मतदारसंघात काँटे की टक्कर पाहायला मिळाली. त्यामध्ये, उदयनराजे आणि शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्यात निकालाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या फेरीपासूनच आघाडी-पिछाडी दिसून येत होती. मात्र, 14 व्या फेरीत उदयनराजेंनी मुसंडी घेत शशिकांत शिंदेंना मागे टाकल्याचं दिसून आलं. उदयनराजे 14 व्या फेरीत 4000 मतांनी आघाडी घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी जलमंदिर पॅलेसवर जाऊन एकज जल्लोष केला. त्यावेळी, उदयनराजे भावूक झाल्याचं दिसून आलं. उदयनराजेंचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 


नुकतेच हाती आलेल्या पंधराव्या फेरी अखेर उदयनराजे भोसले यांना 9736 मतांनी आघाडी मिळाली आहे. शशिकांत शिंदें पिछाडीवर पडले असून उदयनराजेंना 4, 79, 304 मतं मिळाली आहेत. तर, शशिकांत शिंदेंना 4, 69, 568 मत मिळाली आहे. अद्यापही काही फेऱ्या बाकी आहेत. मात्र, तत्पूर्वीच जलमंदिर पॅलेसवर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे. राज्यातील सर्वाधिक चर्चेतील मतदारसंघातील मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघ होय. सातारा लोकसभा मतदारसंघ महायुतीत भाजपकडे गेला. भाजपनं राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली. दुसरीकडे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे  होता. महाविकास आघाडीतून विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे लोकसभेच्या रिंगणात होते. दोन्ही बाजूनं सातारा लोकसभा मतदारसंघासाठी जोरदार प्रचार करण्यात आला. सातारा लोकसभा मतदारसंघात एकूण सरासरी 63.16 टक्के मतदान झाले. साताऱ्यात 11 लाख 93 हजार 492 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सातारा लोकसभा मतदारसंघात अखेर उदयनराजे भोसले यांनी आघाडी घेतली आहे. शशिकांत शिंदे 13 व्या फेरीनंतर पिछाडीवर गेले आहेत. 



साताऱ्यातून उदयनराजेंनी आघाडी घेतल्यानंतर जलमंदिर पॅलेस येथे कार्यकर्त्यांनी गर्दी केली. उदयनराजेंच्या नावाने घोषणाबाजी करत एकच जल्लोष केला. यावेळी, कार्यकर्त्यांचं प्रेम पाहून उदयनराजे भावूक झाल्याचं दिसून आलं. तर, त्यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले ह्याही उदयनराजेंसमवेत होत्या. त्यांनी उदयनराजेंना प्रेमाने मिठी मारली, तर कार्यकर्त्यांनीही जल्लोष केला. त्यामुळे, उदयनराजे अतिशय भावूक झाले होते, त्यांनी कार्यकर्त्यांना हात जोडून आभार मानले. 


खासदार उदयनराजे भोसले यांचा प्रचार कसा झाला?


महायुतीचं जागावाटप जाहीर होण्याअगोदर खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु केली होती. महायुतीत ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भाजपकडे घेण्यात आली. भाजपनं उशिरानं उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर केली. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कराड येथे प्रचार सभा घेतली. तर, प्रचाराच्या समारोपाची सभा साताऱ्यात झाली. त्या सभेला महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. वाई विधानसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले यांच्यासाठी अखेरच्या टप्प्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचार सभा घेतली.