Loksabha Election 2024: सातारा/मुंबई - लोकसभा निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला आजपासून सुरुवात झाली असून महाराष्ट्रातील विदर्भात पहिल्या टप्प्यातील लढती होत आहेत. नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आज पहिल्या टप्प्यात मतदान झाले. तर, पश्चिम महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यात होत असलेल्या लोकसभा मतदानासाठी (Loksabha Election) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. गुरुवारी मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला. त्यामध्ये, साताऱ्याचे राजे आणि विद्यमान खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनीही उमेदवारी भरला. या अर्जासमवेत त्यांनी जोडलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या संपत्तीची सखोल माहिती समोर आली. त्यानुसार, जमीन जुमला, सोन्या-नाण्याची आरास, गाडी-घोडा बंगला, राजेशाही थाट अशीच त्यांची गडगंज संपत्ती दिसून येते आहे. तर, कोल्हापूरच्या गादीचे महाराज छत्रपती शाहूराजे (Shahu Chhatrapati) यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्याही संपत्तीचा असाच थाट दिसून आला.


सातारच्या गादीला आणि कोल्हापूरच्या गादीला महाराष्ट्रात मोठा मान आहे. या दोन्ही घराण्यांचे वंशज आजही राजेशाही थाटात जीवन जगत असल्याचं अनेकदा पाहायला मिळते. विजयादशमीच्या सणाला पारंपारिक पद्धतीने राजेशाही पद्धतीने दोन्ही भोसले घराण्याचा दसरा पाहायला मिळतो. त्यावरुनच, दोन्ही राजेंच्या संपत्तीची आणि श्रीमंतीची चर्चाही होत असते. मात्र, आता निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या संपत्ती विवरणपत्रातून दोन्ही राजेंची संपत्ती सार्वजनिक झाली आहे. त्यानुसार, सातारच्या गादीचे महाराज उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरच्या गादीचे महाराज छत्रपती शाहू यांची संपत्ती अब्जावधींमध्ये आहे. मात्र, या संपत्तीत कोल्हापूरच्या शाहू छत्रपतींची संपत्ती अधिक असल्याचं आकडेवारीवरुन दिसून येते. 


उदयनराजेंची संपत्ती


उदयनराजे, त्यांच्या पत्नी, मुले व भोसले कुटुंबांची एकूण संपत्ती 296 कोटी 39 लाख 11 हजार 585 रुपये एवढी आहे. त्यामध्ये, उदयनराजेंच्या पत्नी व मुलांच्या संपत्तीचाही समावेश आहे.उदयनराजेंची एकूण स्थावर आणि जंगम संपत्ती 1 अब्ज 90 कोटी 93 लाख 64 हजार 634 रुपये आहे. तर, त्यांच्या पत्नीची एकूण संपत्ती स्थावर आणि जंगम मालमत्ता 6 कोटी 89 लाख 47 हजार 201 रुपये एवढी आहे. उदयनराजेंकडे १ कोटी ९० लाख ५ हजार १६५ रुपये किमतीच्या अलिशान गाड्या आहेत. उदयनराजेंकडे १७२ कोटी ९४ लाख ४९ हजार ६९१ रुपये किमतीची शेतजमीन आहे. तर, पत्नीकडे ३ कोटी ७९ लाख ३७ हजार ५७० आणि मुलाच्या नावे ३ लाख १४ हजार ८२० रुपये किमतीची जमिन आहे. भोसले कुटुंबीयांकडे २८ कोटी ७९ लाख ४८ हजार ५६५ रुपये किंमतीची शेतजमीन असल्याचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात आहे. उदयनराजेंकडे 30, 863 ग्रॅम सोनं चांदी, त्यांच्या पत्नीकडे 4750 ग्रॅम दागिने, कुटुंबाकडील सोने 628 ग्रॅम, तर मुलीचे सोनं 7054 ग्रॅम आहे. दरम्यान, उदयनराजेंवर 2 कोटी 44 लाख 63 हजार 842 रुपयांचे कर्ज आहे. 


छत्रपती शाहू महाराजांची संपत्ती


शाहू शहाजी छत्रपती यांच्या नावे स्थावर व जंगम अशी मिळून 297 कोटी 38 लाख 08 हजार रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी संपत्ती विवरणपत्रात नमूद केले आहे. त्यांच्या पत्नी याज्ञसेनीराजे छत्रपती यांच्या नावे 41 कोटी 06 लाखांची संपत्ती आहे.म्हणजेच शाहू महाराजा व त्यांच्या पत्नीची एकूण संपत्ती 338 कोटी 44 लाख 8 हजार एवढी आहे. विशेष म्हणजे शाहू महाराजांवरही कसलेही कर्ज नाही. 


शाहू छत्रपतींची १४७ कोटी ६४ लाख ४९ हजार रुपयांची जंगम मालमत्ता, तर 149 कोटी 73 लाख 59 हजारांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नी याज्ञसेनीराजे यांच्या नावे अनुक्रमे 17 कोटी 35 लाख व 23 कोटी 71 लाखांची जंगम व स्थावर मालमत्ता आहे. शाहूंकडे 1 कोटी 56 लाखांचे सोन्याचे, तर 55 लाखांचे चांदीचे दागिने आहेत. शाहू छत्रपतींच्या नावावरील वाहनांची किंमत सहा कोटी आहे. 122 कोटी 88 लाख इतक्या किंमतीची शेतजमीन त्यांच्या नावावर आहे. तर, पत्नी याज्ञसेनी यांच्या नावावर सात कोटी 52 लाख रुपयांची शेतजमीन आहे. 


दरम्यान, दोन्ही राजांची संपत्तीची आकडेवारी पाहिल्यानंतर कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांची संपत्ती अधिक असल्याचे दिसून येत आहे. तर, शाह महाराज छत्रपती हे महाराष्ट्रातील श्रीमंत उमेदवार असल्याचेही आत्तापर्यंतच्या आकडेवारीवरुन समजते. 


संबंधित बातम्या


'श्रीमंत' शाहू छत्रपती अब्जाधीश, महाराजांवर कसलेही कर्ज नाही ; निवडणुकांमुळे समोर आली संपत्तीची माहिती


जमीन जुमला, सोन्या-नाण्याची आरास, गाडी-घोडा बंगला, राजेशाही थाट, उदयनराजेंची संपत्ती किती