कोल्हापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात यंदा सातारा आणि कोल्हापुरात राजघराण्याचे वारसदार निवडणुकांच्या मैदानात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) भाजपाकडून साताऱ्यात उमेदवार आहेत. तर, कोल्हापुरातून श्रीमंत शाहू छत्रपती (Shahu Maharaj) हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे, कोल्हापुरात मोदी विरुद्ध गादी अशा प्रचारातून महाविकास आघाडीने जोर घेत भाजपला लक्ष्य केलं आहे. शाहू छत्रपतींविरुद्ध महायुतीकडून संजय मंडलिक (Sanjay Mandlik) निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे, एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणार यात शंका नाही. त्यातच, मंडलिक यांनी थेट गादीवरच पहिला प्रहार केला, त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही पलटवार केला आहे. दोन्ही उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे त्यांच्या संपत्तीचे विवरण समोर आले आहे. 


कोल्हापूरच्या गादीचे वारसदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनीही आपल्या उमेदवारी अर्जासोबत एकूण संपत्तीची माहिती दिली आहे. त्यानुसार, शाहू शहाजी छत्रपती यांच्या नावे स्थावर व जंगम अशी मिळून 297 कोटी 38 लाख 08 हजार रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी संपत्ती विवरणपत्रात नमूद केले आहे. त्यांच्या पत्नी याज्ञसेनीराजे छत्रपती यांच्या नावे 41 कोटी 06 लाखांची संपत्ती आहे. विशेष म्हणजे शाहू महाराजांवर कसलेही कर्ज नाही.


शाहू छत्रपतींची १४७ कोटी ६४ लाख ४९ हजार रुपयांची जंगम मालमत्ता, तर 149 कोटी 73 लाख 59 हजारांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नी याज्ञसेनीराजे यांच्या नावे अनुक्रमे 17 कोटी 35 लाख व 23 कोटी 71 लाखांची जंगम व स्थावर मालमत्ता आहे. शाहूंकडे 1 कोटी 56 लाखांचे सोन्याचे, तर 55 लाखांचे चांदीचे दागिने आहेत. शाहू छत्रपतींच्या नावावरील वाहनांची किंमत सहा कोटी आहे. 122 कोटी 88 लाख इतक्या किंमतीची शेतजमीन त्यांच्या नावावर आहे. तर, पत्नी याज्ञसेनी यांच्या नावावर सात कोटी 52 लाख रुपयांची शेतजमीन आहे. शाहू महाराजांचे प्रतिस्पर्धी उमदेवार संजय मंडलिक हेही कोट्यधीश आहेत. त्यांच्याकडे तब्बल 14 कोटी रुपयांची संपत्ती आहे.


महायुतीचे संजय मंडलिक हेही कोट्यधीश


कोल्हापूर मतदारसंघातील शाहू छत्रपतींचे प्रतिस्पर्धी आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांची एकूण संपत्ती 14 कोटी 37 लाख 28 हजार 398 रुपये एवढी आहे. मंडलिक यांच्या संपत्तीत 2019 च्या तुलनेत तब्बल 5 कोटी 65 लाख रुपयांची वाढ झाली आहे. खा. मंडलिक यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात जंगम मालमत्ता 1 कोटी 15 लाख 32 हजार 525 रुपये असल्याचे म्हटले आहे. तर, 13 कोटी 21 लाख 95 हजार 873 रुपये किमतीची स्थावर मालमत्ता असल्याचे त्यांनी विवरणपत्रात नमूद केले आहे.


गादीच्या वारसदारावरुन टीका, महाविकास आघाडीचाही पलटवार


श्रीमंत शाहू विरुद्ध संजय मंडलिक यांच्यात राजकीय लढत प्रभावी असल्याने महाराष्ट्राचे लक्ष या लोकसभा मतदारसंघात लागले आहे. शाहू महाराजांनी काँग्रेसकडून उमेदवारी घेतली असली तरी, शिवसेनेनं ही जागा दिल्याने शिवसेनेनंही शाहू छत्रपतींच्या विजयासाठी रणशिंग फुंकले आहे. त्यामुळेच, प्रचारभेत मंडलिक यांनी शाहू महाराज हे खरे वारसदार नाहीत. यांना दत्तक घेण्यात आलं होतं, असं म्हटलं होतं. त्यांच्या या विधानावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खोचक पलटवार केला. "छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरच्या राजघराण्याचे खरे वारसदार नसतील तर मग संजय मंडलिक हे वारसदार आहेत का?, असा सवाल राऊत यांनी विचारला आहे. 


''माझ्या माहितीप्रमाणे सदाशिवराव मंडलिक हे शाहू महाराजांच्या खूप जवळ होते. शाहू, फुले आंबेडकरांचा विचार घेऊनच ते कोल्हापुरात काम करत होतो. कोल्हापूरची गादी ही शाहू महाराजांची, शिवाजी महाराजांची गादी आहे. त्या गादीविषयी महाराष्ट्राला नेहमीच आदर आणि श्रद्धा आहे. या निवडणुकीत तुमच्या पायाखालची वाळू शरकते आहे. त्यामुळेच महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानावर चिखलफेक केली जात आहे. हे चांगले लक्षण नाही," अशी जबरी टीकाही संजय राऊतांनी प्रत्त्युतरात मंडलिक यांच्यावर केली.