अकोला: लोकसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर नेमकं कुणाशी राजकीय आघाडी करणार?हा प्रश्न आज निकाली निघालाय. प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) महाविकास आघाडीसोबत राजकीय आघाडीपेक्षा मनोज जरांगे पाटलांशी सामाजिक आघाडी करीत असल्याचं जाहीर करीत खळबळ उडवून दिलीय. आज अकोल्यात त्यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या पक्षाचे 8 उमेदवार जाहीर केले. उमेदवार जाहीर करतांना त्यांनी राजकीयदृष्ट्या उपेक्षित समाजांना यादीत स्थान देत त्यांच्या 'अकोला पॅटर्न'मधील 'सोशल इंजिनिअरींग' साधण्याचा प्रयोग केलाय. 


महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर 'आंबेडकर' हे 'ब्रँड नेम' असलेले प्रकाश आंबेडकर ओळखले जातात त्यांच्या नवनव्या आणि अचाट राजकीय प्रयोगांसाठी... त्यांनी रूढ केलेला 'अकोला पॅटर्न' हा अलिकडच्या 'सोशल इंजिनिअरींग' संकल्पनेचा जन्मदाता आहेत. आपल्या दलित समाजासोबत अठरापगड जाती, राजकीय व्यवस्थेत ओळख नसलेल्या छोट्या जातींची मोट बांधत त्यांनी या लोकांना सत्तेत स्थान दिलंय.  2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी कट्टर मुस्लिम विचारधारा मानणाऱ्या तेलंगणातील 'एमआयएम'सोबत आघाडी करीत राजकीय पटलावर खळबळ उडवून दिली होतीय. दलित, मुस्लिम, मायक्रो मायनॉरिटीज, आंबेडकरांना मानणारा ओबीसी याची मोट बांधत 2019 मध्ये लोकसभेत आंबेडकरांनी 42 लाख मतं घेतली होती. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तीयाज जलील यांच्या नावानं 'एमआयएम'चा एक खासदारही निवडून आणला होता. गेल्यावेळी 'एमआयएम'शी राजकीय आघाडी करणार्या आंबेडकरांनी यावेळी मात्र मनोज जरांगे पाटलांशी लोकसभेसाठी सामाजिक आघाडी केलीय. 


आंबेडकरांनी आज अकोल्यात राजकीय भूमिका मांडतांना प्रस्थापित राजकारणावर कठोर प्रहार केलाय. भटके-विमुक्त, दलित आदिवासी, मुस्लिम, जैन या राजकीय दुर्लक्षित घटकांना आपल्या नव्या राजकीय प्रयोगात सामावून घेणार असल्याचे आंबेडकर म्हणालेय. त्यातच त्यांनी आज जाहीर केलेल्या 8 उमेदवारांत आठ जातींना स्थान दिलंय. यात मराठा, बौद्ध, तेली, माळी, बंजारा, गोंड, ढिवर, खाटीक अशा समाजघटकांना स्थान देण्यात आले आहे.



वंचितने आज जाहीर केलेले लोकसभा उमेदवार आणि त्यांची जात : 



1)भंडारा-गोंदिया- संजय गजानंद केवट - ढिवर 
2)गडचिरोली-चिमूर -हितेश पांडुरंग मडावी : गोंड
3)चंद्रपुर -राजेश वारलुजी बेले : तेली
4)बुलढाणा -वसंत राजाराम मगर : माळी 
5)अकोला- प्रकाश यशवंत आंबेडकर : बौद्ध
6)अमरावती - प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान : खाटीक
7)वर्धा-  प्रा.राजेंद्र साळुंके : मराठा
8)यवतमाळ-वाशीम -सुभाष खेमसिंग पवार : बंजारा


उमेदवार, त्यांची जात आणि आंबेडकरांची राजकीय व्यवहार्यता 


1) अकोला : प्रकाश आंबेडकर


स्वत: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष. 1998 आणि 1999 असे दोनदा अकोल्यातून काँग्रेसच्या पाठिंब्याने खासदार. अकोला जिल्हा परिषद आणि बहुतांश पंचायत समित्यांवर सत्ता. अकोल्यात दलित, मुस्लिम, कुणबी आणि अल्प समाजघटकांना सोबत घेत विजयासाठी प्रयत्न. 


2) चंद्रपूर : राजेश बेले 


राजेश बेले हे तेली समाजाचे असून गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण क्षेत्रात कार्यरत आहेत, संजीवनी सामाजिक पर्यावरण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यातील पर्यावरण आणि प्रदूषणाचे अनेक मुद्दे लावून धरले आहे, गेल्या काही वर्षांपासून त्यांनी ओबीसी समाजाचे मुद्दे उचलून आंदोलने केली आहे, मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर त्यांनी विरोधात अनेक आंदोलनं केली, चंद्रपूर आणि वर्धा मतदारसंघातील तेली मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न. 


3) यवतमाळ-वाशिम : सुभाष पवार


सुभाष पवार हे या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात असलेल्या बंजारा समाजाचे. मतदारसंघातील पुसद आणि दिग्रस विधानसभेत सध्या बंजारा समाजाचे आमदार. राज्यातील 10 लोकसभा मतदारसंघात निर्णायक असलेल्या बंजारा समाजाला या माध्यमातून आपलंस करण्याचा प्रयत्न. बंजारा, मुस्लिम, दलित आणि ओबीसींची मोट मतदारसंघात बांधण्याचा प्रयत्न. 


4) वर्धा : प्रा. राजेंद्र साळुके


राजेंद्र साळुके  हे मराठा समाजातील उमेदवार. या माध्यमातून राज्यात जरांगे पाटलांच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या मराठा आंदोलनाला बळ देण्याचा प्रयत्न. जरांगे यांच्याशी असलेल्या आघाडीचा फायदा या मतगारसंघास इतर ठिकाणी होईल असा कयास. 


5) अमरावती : प्राजक्ता पिल्लेवान


अनुसुचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात आंबेडकरांनी तिशीतील तरुणीला दिली संधी. हिंदू खाटीक असल्याने हिंदू मतदार आपलेसे करण्याचा प्रयत्न. नवनीत राणांसमोर तरुण महिला उमेदवार देत त्यांचं स्टारडम कमी करण्याचा प्रयत्न.


6) भंडारा-गोंदिया- संजय गजानंद केवट


 संजय केवट हे ढिवर समाजातील उमेदवार. या मतदारसंघात या समाजाला उमेदवारी देत सामाजिक संतुलन साधण्याचा आंबेडकरांचा प्रयत्न. इतर समाज या माध्यमातून वंचितसोबत जोडण्याचा प्रयत्न. 



7) गडचिरोली-चिमूर -हितेश पांडुरंग मडावी


अनुसुचित जमातीसठी: राखीव असलेल्या या मतदारसंघात मोठ्या संख्येने असलेल्या गोंड समाजाला आंबेडकरांची उमेदवारी.अहेरीचे राजघराणे याच समाजाचे. त्यामूळे समाजमनावर या समाजाचा मोठा पगडा आहे. गोंड, माडिया या आदिवासी समाजाला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात अणत त्याचा राजकीय फायदा व्हावा हा मानस. 


8) बुलडाणा : वसंतराव मगर


मगर या मतदारसंघात निर्णायक असलेल्या माळी समाजाचे. या मतदारसंघात तब्बल 3.50 लाख माळी मतदार आहेत. मागच्या निवडणुकीत वंचितच्या माळी समाजातील उमेदवाराने या मतदारसंघात 1 लाख 78 हजार मतं  घेतली होती. दलित, माळी, ओबीसी आणि मुस्लिमांची मोट या मतदारसंघात बांधण्याचा प्रयत्न. 


आणखी वाचा


मोठी बातमी : प्रकाश आंबेडकर जरांगेंच्या भेटीसाठी थेट आंतरवालीत; लोकसभेबाबत तासभर चर्चा