सोलापूर : माढ्याच्या उमेदवारीवरून (Madha Lok Sabha Election) महायुतीत सुरू झालेला वाद अद्याप शमण्याची चिन्हं नाहीत. मोहिते पाटलांच्या नंतर आता राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही रणजितसिंह निंबाळकरांना उघड विरोध केला आहे. रणजितसिंह निंबाळकरांची (Ranjit Nimbalkar) प्रचार करण्याची आमची मानसिकता नाही, उमेदवार बदला अशी मागणी करत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट अजित पवारांनाच साकडं घातलं आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी काय?
माढा लोकसभेत भाजपने रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी जाहीर केली आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकाही कार्यकर्त्यांची त्यांचा प्रचार करण्याची इच्छा नाही. आम्ही बरं बोलण्यापेक्षा खरं बोलण्यासाठी, अजितदादा तुमच्यासमोर आलोय. भाजपचा आणि उमेदवाराचा सगळा एक कलमी कार्यक्रम आहे. त्यामुळं तुम्ही भाजपचा उमेदवार बद्दलण्याबाबत विचार करावा. भाजपच्या वरिष्ठांना हे कळवावे. निंबाळकर सोडून कोणताही उमेदवार द्या, आम्ही जोमाने काम करू आणि त्यांना खासदार बनवू.
मोहिते पाटील राष्ट्रवादीत जाणार?
माढा लोकसभा उमेदवारीचा तिढा वाढणार असून मोहिते पाटील यांच्या नाराजीचा फायदा उठवण्यासाठी राष्ट्रवादी खासदार अमोल कोल्हे यांनी अकलूज येथील निवासस्थानी विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली . आपण एका लग्नाला आलो होतो म्हणून जाता जाता भेटलो असं उत्तर देत कोल्हे यानी वेळ मारून नेली .
मात्र भाजपने डावलल्याने नाराज झालेले मोहिते पाटील शरद पवार गटात प्रवेश करायचा तयारीत असल्याची माहिती आहे. यासंदर्भात मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी भेट घेण्यासाठी कोल्हे पोहोचले होते . यापूर्वी कोल्हे यांनी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके याना फोडून महायुतीला धक्का दिला होता . आता मोहिते पाटील यांनाही कोल्हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत नेण्याच्या तयारीत आहेत .
मोहिते यांनी चुकीचा निर्णय घेऊ नये असा पक्षाचा संदेश घेवून प्रशांत परिचारक यांनी आधी मोहिते कुटुंबाची भेट घेतली होती . यानंतर लगेचच कोल्हे पोहोचल्याने मोहिते स्वगृही जाणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
शरदचंद्र पवारांच्या पक्षात प्रवेशाचा मोहिते पाटलांचा निर्णय पक्का असल्याचा दावा माढ्यामध्ये करण्यात येतोय. तुतारीच्या चिन्हावरच माढ्याची निवडणूक लढणार असं वक्तव्य मोहिते पाटलांच्या घरातील जयसिंह मोहिते पाटील यांनी केलं. गुरूवारी विजयसिंह मोहिते पाटील , जयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यांची मुंबई येथे बैठक होणार आहे.
ही बातमी वाचा :