सोलापूर - माढा लोकसभा निवडणुकीत यंदा चांगलाच ट्विस्ट पाहायला मिळाला. लोकसभेसाठी रणजीतसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsingh Naiknimbalkar) यांच्या नावाची घोषणा होताच, अकलूजमधून बंडाचे वारे वाहू लागले. त्यानंतर, वाऱ्याची दिशा पाहून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी माढ्यात डाव टाकत फडणवीसांचा डाव मोडून काढला. भाजपाकडून मंत्री गिरीश महाजन यांनी मोहिते पाटील कुटुंबीयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा चंगच बांधला होता. त्यातच, महादेव जानकर यांनी ऐनवेळी महायुतीच जाऊन आपली उमेदवारी निश्चित केल्याने शरद पवारांनी माढ्यातून मोहिते पाटील कुटुंबातील चिरंजीव मैदानात उतरवला. तर, एक जानकर निघून गेल्यावर दुसऱ्या जानकरांना आपल्यासोबत घेतले. मोहिते पाटील अन् जानकरांचे 30 वर्षांचे वैर संपवले. त्याच, जानकरांनी माढ्यातील सभेत अनेक गौप्यस्फोट केले. त्यामध्ये, माळशिरसमधून राम सातपुतेंच्या पत्नीला उमेदवारी देण्याचा डाव होता, असेही त्यांनी म्हटले. 


मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांच्यात गेल्या 30 वर्षांपासून राजकीय वैर होते. मात्र, लोकसभा निवडणुकांच्यानिमित्ताने दोन्ही नेत्यांचे मनोमिलन झाले असून जानकरांनी धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करण्याचा विडाच उचलल्याचे त्यांच्या भाषणावरुन दिसून येते. यावेळी, देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत नागपूर येथील भेटीत काय घडलं, याच उलगडाही त्यांनी केला. 


मोहिते पाटील आणि जानकर एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू होताच, मला थेट बारामतीला विमान पाठवून फडणवीस यांनी नागपूरला बोलावून घेण्यात आले. तिथे बावनकुळे आणि इतरही जेष्ठ नेते होते. मी अर्धा तास माझी व्यथा सांगत होतो तेंव्हा अखेर बावनकुळे यांनी तुम्हाला नेमके काय हवे आहे असा थेट सवाल केला. तसेच, तुमचा जर फडणवीस यांचेवर विश्वास नसेल तर मी गडकरींना फोन लावून देऊ का असे बावनकुळे विचारत होते.मात्र, मला मागायचे काहीच नव्हते, द्यायचे असेल तर माझ्या कार्यकर्त्यांच्या १० वर्षाच्या नुकसानीची भरपाई द्या असे मी बावनकुळे व फडणवीसांना म्हटल्याचे जानकर यांनी जाहीर सभेत सांगितले. मला फडणवीस हे चंद्र सूर्य देखील द्यायला तयार झाले असते पण मोहिते आणि आमचे अगोदरच ठरले होते, धैर्यशील यांना माढा लोकसभेतून खासदार करायची माझी भूमिका असल्याने मला विमान काय, बोईंग पाठवले तरी मी भाजपकडे जाणार नाही एवढा राग असल्याचे जानकर यांनी बोलून दाखवले. 


राम सातपुतेंच्या पत्नीला विधानसभेची उमेदवारी


धैर्यशील मोहिते पाटील आणि आपले एकत्र येण्याचे सहा महिन्यापासून ठरले होते, याची भाजपला थोडीही माहिती लागू दिली नाही. लोकसभा निवडणुकांसाठी दोघांनीही पक्षाकडे उमेदवारी मागायची, पक्ष उमेदवारी देणार नाही हेही, आम्हाला माहित होते.भाजपने मोहिते आणि जानकर या दोघांनाही संपवायचा प्लॅन केला होता, असा थेट आरोप जानकर यांनी केला. तर, आमदार राम सातपुतेंसाठी बीडचे पार्सल असा उल्लेख करीत भाजपाचा डावही उघड केला.राम सातपुतेंना सोलापूरमधून खासदार करायचे तर त्यांच्या पत्नी संस्कृती यांना माळशिरसमधून आमदार करायचे भाजपने ठरवले होते, असाही गौप्यस्फोट जानकरांनी आपल्या भाषणातून केला. मोहिते व जानकर कधीच एक येऊ शकत नाहीत, असे भाजपाला वाटले. मात्र, आम्ही सहा महिन्यापूर्वीच एकत्र आलो होतो, असेही ते म्हणाले. 


हेही वाचा


माढ्यात उत्तम जानकरांचा मोठा गौप्यस्फोट; फडणवीसांची भेट अन् 6 महिन्यांपूर्वीचं प्लॅनिंगच भरसभेत सांगितलं