सोलापूर - माढ्यातील मोहिते पाटील अन् जानकर मनोमिलन सभा उत्तम जानकर (Uttam jankar) यांच्या टोलेबाजी आणि पोलखोलने गाजली.उत्तम जानकर यांनी त्यांच्या भाषणात अनेक गौप्यस्फोट करीत येत्या दोन दिवसात माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांचेवर २०२० सालातील एक गंभीर गुन्हा दोन दिवसात दाखल होणार असल्याचे सांगत मोहिते पाटील यांची पंचायत करून ठेवली. विशेष म्हणजे एवढ्यावरच न थांबता, जर धैर्यशील मोहिते पाटील यांना जेल झाली तर मी संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok sabha) उमेदवार म्हणून प्रचार करुन त्यांना ३ लाखांनी निवडून आणेन आणि निकालादिवशी बेल किंवा जेल फोडून त्यांना मिरवणुकीत सामील कारेन, असे वादग्रस्त वक्तव्यही उत्तम जानकर यांनी केले. त्यामुळे, धैर्यशील मोहिते पाटील यांनी नेमका कोणता गुन्हा केला याचीच सवंग चर् आता माढ्यासह सोलापूर जिल्ह्यात रंगली आहे. 


उत्तम जानकर यांना मनोमिलन करायचे आहे की पोलखोल, या चर्चेला सोलपूरसह माढा लोकसभा मतादारसंघातील राजकारणात सुरुवात झाली आहे. त्यामुळे मोहिते जानकर मनोमिलन मेळावा गाजला तो धैर्यशील मोहितें पाटील यांचेवर दाखल न झालेल्या गुन्ह्याच्या वक्तव्यामुळे. जयंत पाटील यांच्या उपस्थितीतील सभेत उत्तम जानकर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.धैर्यशील आणि आपले एकत्र येण्याचे सहा महिन्यापासून ठरले होते, आणि याची भाजपला थोडीही माहिती लागू न दिल्याचे जानकर यांनी म्हटले.यासाठी दोघांनीही पक्षाकडे उमेदवारी मागायची, पक्ष उमेदवारी देणार नाही हेही, आम्हाला माहित होते.भाजपने मोहिते आणि जानकर या दोघांनाही संपवायचा प्लॅन केला होता असा थेट आरोप जानकर यांनी केला. तर, बीडचे पार्सल असा उल्लेख करीत आमदार राम सातपुते भाजपाचा डावही उघड केला. राम सातपुतेंना सोलापूरमधून खासदार करायचे तर त्यांच्या पत्नी संस्कृती यांना माळशिरसमधून आमदार करायचे भाजपने ठरवले. मोहिते व जानकर कधीच एक येऊ शकत नाहीत असे भाजपाला वाटले. मात्र, आम्ही सहा महिन्यापूर्वीच एकत्र आलो होतो, असा गौप्यस्फोटही जानकरांनी केला. 


नागपूर भेटीतील किस्सा उलगडला


आम्ही एकत्र येणार याच्या चर्चा सुरु झाल्यावर मला थेट बारामतीला विमान पाठवून फडणवीस यांनी नागपूरला बोलावून घेतले. तिथे बावनकुळे आणि इतरही जेष्ठ नेते होते. मी अर्धा तास माझी व्यथा सांगत होतो तेंव्हा अखेर बावनकुळे यांनी तुम्हाला नेमके काय हवे आहे असा थेट सवाल केला. तसेच, तुमचा जर फडणवीस यांचेवर विश्वास नसेल तर मी गडकरींना फोन लावून देऊ का असे बावनकुळे विचारत होते.मात्र, मला मागायचे काहीच नव्हते , द्यायचे असेल तर माझ्या कार्यकर्त्यांच्या १० वर्षाच्या नुकसानीची भरपाई द्या असे मी सांगितल्याचे जानकर यांनी जाहीर सभेत सांगितले. मला फडणवीस चंद्र सूर्य देखील द्यायला तयार झाले असते पण मोहिते आणि आमचे अगोदरच ठरले होते, धैर्यशील यांना माढा लोकसभेतून खासदार करायची माझी भूमिका असल्याने मला विमान काय, बोईंग पाठवले तरी मी भाजपकडे जाणार नाही एवढा राग असल्याचे जानकर यांनी बोलून दाखवले.


माझ्यावर 23 केसेस आहेत


धैर्यशील मोहिते यांच्यावर गेल्या आठ दिवसापासून जुन्या खुनाच्या केसमध्ये अडकविण्याचा प्रयत्न सुरू असून येत्या दोन दिवसात त्यांना अटकही होईल, असा गौप्यस्फोट करताना राजकारण इतक्या खालच्या पातळीला येऊ नये असे जानकर यांनी म्हटले. मोहिते पाटील यांनीही आजवर आपल्यावर २३ केसेस दाखल केल्या आहेत. कारण, मीही काही गुणी बाळ नव्हतो, तलाठ्याला मार, पाटकऱ्याला मार असे उद्योग करीत असल्याने या केसेस दाखल असल्याची कबुली दिली. आपला अनुसूचित जातीचा दाखल रद्द करण्याच्या धमक्या आपल्याला येत असून अशी जर न्यायव्यवस्था काम करायला लागली तर मी बॉम्ब बनून काम करेन असे वादग्रस्त विधान जानकरांनी केले.जानकर यांनी हिंदू खाटीक जातीचा दाखल मिळवला असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने दाखलाच रद्द झाल्यावर कसा आमदार होणार, असा सवाल विरोधक करीत असल्याचेही जानकर यांनी सभेतून सांगितले.


तेव्हाच अजित पवारांचा पक्ष सोडणार


मी सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असून आता बारामतीत पक्षाच्या अध्यक्षाचा पराभव करुन मगच पक्ष बदलेन असेही जानकर यांनी म्हटले. बारामती मधून सुनेत्रा पवार उभ्या असून यावेळी त्यांचा पराभव केल्याशिवाय आणि सुप्रिया सुळे यांना विजयी केल्याशिवाय मी अजित पवार यांचा पक्ष सोडत नाही, असा टोलाही आपल्या भाषणात लगावला.