Unmesh Patil, जळगाव : लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक नेते भाजपमध्ये किंवा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत होते. अशा जळगावमधून तत्कालीन भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. उद्धव ठाकरेंना अनेक नेते सोडून जात असताना उन्मेश पाटलांना जळगाव लोकसभा निवडणुकीत भाजपशी दोनहात केले होते. दरम्यान, संकटकाळात साथ देणार्या उन्मेश पाटलांना आता ठाकरेंच्या शिवसेनेने एबी फॉर्म दिल्याची माहिती आहे. ठाकरेंनी आम्हाला एबी फॉर्म दिल्याची प्रतिक्रिया उन्मेश पाटील यांचे वडिल भैय्यासाहेब पाटील यांनी एका वृत्तवाहिनी दिलेल्या मुलाखतीत दिली आहे. दरम्यान, यावेळी उन्मेश पाटलांच्या पत्नीला अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले.
उन्मेश पाटलांचे वडिल काय काय म्हणाले?
उन्मेष पाटील यांना उद्धव ठाकरेंनी उमेदवारी जाहीर करुन एबी फॉर्म दिली आहे. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्याचा आनंद आहे. एका डोळ्यात अश्रू तर एका डोळ्यात दुःख आहे. वास्तविक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची जागा असताना राजीव देशमुख यांनी मोठे मन करून उमेदवारी मिळवून दिली. त्यांचे मी आभार व्यक्त करेन असं भैय्यासाहेब पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. लोकसभा निवडणुकीत उन्मेश पाटलांचं तिकीट भाजपने कापलं होतं. त्यानंतर ते संजय राऊत यांच्याशी संपर्क करत ठाकरेंच्या शिवसेनेत आले होते. त्यामुळे ऐननिवडणुकीच्या काळात ठाकरेंना दिलेली साथ उन्मेश पाटलांना फायद्याची ठरल्याचे बोलले जात आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत चाळीसगावमध्ये लढत कशी झाली?
2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या मंगेश चव्हाण यांनी बाजी मारली होती. त्यांनी 86515 मतं मिळवली होती. मात्र,2019 मध्ये उन्मेश पाटलांनी लोकसभेत विजय मिळवल्यामुळे ते विधानसभा निवडणुकीत उतरले नाहीत. यापूर्वी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत उन्मेश पाटील 94 हजार मतं मिळवून विजयी झाले होते. त्यामुळे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात उन्मेश पाटलांचा प्रभाव असल्याचे बोलले जाते.
एबी फॉर्म मिळाल्यानंतर उन्मेश पाटलांच्या पत्नीला अश्रू अनावर
उन्मेश पाटलांना एबी फॉर्म मिळाल्यानंतर त्यांच्या पत्नी संपदा पाटील यांना अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले. शिवाय, संपदा पाटील यांनी उमेदवारी निश्चित झाल्याने आनंदही व्यक्त केला. "2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला निवडून आणण्यासाठी आम्ही कष्ट घेतले होते. उन्मेश पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील भाजपची सत्ता आणली होती. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बहुजन समाजातील उच्च शिक्षित तरुणीला भाजपने नाकारले. कट कारस्थान करुन घात केला", असंही संपदा पाटील म्हणाल्या.
इतर महत्त्वाच्या बातम्या