Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सलग तीन दिवस आता सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात 21 ते 23 फेब्रुवारीपर्यंत घटनापीठ सुनावणी घेणार आहे. निवडणूक आयोगाच्या निकालाबाबत ठाकरे गट आक्षेप घेण्याची शक्यता आहे.  न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ हे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी करत आहे. मागच्या आठवड्यात सलग तीन दिवस सुनावणी झाली होती आणि त्याच्यानंतर हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे द्यायचं की नाही? याबाबत न्यायमूर्तींनी आपलं मत नोंदवलं होतं. त्यानंतर आता या आठवड्यात 21, 22 आणि 23 म्हणजे सलग तीन दिवस याप्रकरणी घटनापीठाचं कामकाज होण्याची शक्यता आहे. यादरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाचा जो निर्णय आला आहे, त्यासंदर्भात ठाकरे गटाला आक्षेप आहे. याबाबतही युक्तिवाद या तीन दिवसात केला जाऊ शकतो. ही खूप महत्वाची सुनावणी असून घटनापीठाने एका आठवड्यानंतरची तारीख दिली होती. त्यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी आता आणखी वेगाने सुरु झाली आहे.        


Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: राज्यातल्या सत्तासंघर्षाची सुनावणी तूर्तास 5 न्यायमूर्तींचंच घटनापीठच करणार


तत्पूर्वी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षाच्या प्रकरणात एक मोठा निर्णय दिला. सत्तासंघर्षाचं प्रकरण सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग करावं, अशी विनंती ठाकरे गटाने घटनापीठाकडे केली होती. याचप्रकरणी निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने राज्यातल्या सत्तासंघर्षाची सुनावणी तूर्तास 5 न्यायमूर्तींचंच घटनापीठच करणार असल्याचं सांगितलं. ठाकरे गटानं यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली होती आणि हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग करावं, अशी विनंती घटनापीठाकडे केली होती. या प्रकरणावर गेले तीन दिवस सलग सुनावणी झाली होती. सर्वोच्च न्यायालयानं दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं आणि अखेरीस न्यायालयाने या प्रकरणावर 17 फेब्रुवारी निर्णय सुनावला.


Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण शिंदे गटाला, निवडणूक आयोगाचा निर्णय 


दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता. निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरु होती. आज निवडणूक आयोगानं याबाबतचा निर्णय दिला आहे. यात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव देखील मिळालं आहे. त्यामुळे यापुढे एकनाथ शिंदे यांचीच शिवेसना असणार आहे. ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना निसटली आहे. याबाबत ठाकरे गट आता न्यायालयात दाद मागणार आहे, असं स्वतः उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे.