Lok Sabha Election 2024 : शेतकऱ्यांना उपाशी ठेवणारे, महिलांचा अपमान करणारे, युवकांना बेरोजगार करणारे, दहा वर्षात देश लुटून कंगाल करणारे, हुकूमशहा मोदी सरकार आपल्याला हाणून पाडायचे आहे.  संविधानावर चालणारे महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) भारत सरकार आपल्याला निवडून आणायचे आहे. लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी ही लढाई आहे. समाजातील प्रत्येक घटकाला असमाधानी करणाऱ्या मोदी सरकारविरुद्ध देशात असंतोषाची मोठी लाट निर्माण झाली आहे. या संधीचा फायदा घेऊन प्रामाणिक आणि स्वच्छ प्रतिमेच्या बळवंत वानखडेंना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, अशी कळकळीची विनंती करत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधलाय. देशात आपल्याला मोदी सरकार नव्हे तर भारत सरकार हवं आहे असे म्हणत, खासदार नवनीत राणांचा हिशोब चुकता करा, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलंय. 


भ्रम, थापाड्यांची लंका म्हणजेच भाजप  


अमरावती लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ आज संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे विराट सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उद्धव ठाकरे सभेला संबोधित करत होते. पुढे बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, ही निवडणूक शेतकऱ्यांच्या जीवनमरणाची लढाई आहे. खतांवर 18 टक्के जीएसटी लावून देशाला लुटणारे मोदी सरकार संविधान बदलविण्याचा डाव आखत आहे. मोदींना महाराष्ट्राबद्दल आकस आहे. दहा वर्षात देशाला कंगाल करणारे मोदी सरकार नको, आम्हाला भारत सरकार पाहिजे. शेतकऱ्यांची मुले आत्महत्या करीत आहे. मणिपूर सारख्या घटना घडल्यानंतरही मुनगंटीवार सारखा सांस्कृतिक मंत्री बहीण भावाच्या नात्याबद्दल अभद्र बोलताय. अश्याबद्दल चिक्कार शब्द न काढता भाजप मूग गिळून बसले आहे. दहा वर्षात कवडीचे योगदान न देणारे हे सरकार गद्दारांनाच पाठबळ देऊ शकते. भ्रम, थापाड्यांची लंका म्हणजेच भाजप होय, असा आरोप सुद्धा उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला.


दरम्यान, हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर नवनीत राणांचा पराभव करण्यासाठी चांगले वातावरण निर्माण केल्याबद्दल अमरावतीकरांना धन्यवाद देत, या नौटंकीबाजांना पराभूत करून बदला घेण्याचे आवाहन शिवसैनिकांसह महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून केलंय .


चूक दुरुस्त करण्याची वेळ - शरद पवार


मागील निवडणुकीत मी आपल्याला चुकीच्या माणसासाठी मतदान करण्याची विनंती केली होती. त्यांना आपण निवडून आणले होते, परंतु ती माझी मोठी चूक होती.आता चूक दुरुस्त करण्याचीवेळ आली असून  बाप बदलणाऱ्यांना घरी बसविण्याची चांगली संधी आली आहे. यावेळी स्वच्छ प्रतिमेच्या बळवंत वानखडेंना विजयी करण्याची विनंती शरद पवार यांनी केली. सध्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला पोषक वातावरण आहे. यामध्ये शिवसैनिक पुढे आहेत याबद्दल उद्धव ठाकरे यांचे आभार व्यक्त करून शरद पवार यांनी खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी सर्वांनीच एकत्र येण्याचे आवाहन केले. ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. हा देश राज्यघटनेमुळे एकसंघ राहिला या राज्यघटनेला कुणीही धक्का लावू नये त्याकरिता मोठ्या प्रमाणात मतदान करून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले.


इतर महत्वाच्या बातम्या