Eknath Shinde : शिर्डी लोकसभा मतदारसंघात (Shirdi Lok Sabha Constituency) महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरीता आज जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्याने त्यांना पाठवलेले पत्रच मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवले. यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याने भाऊसाहेब वाकचौरेंवर गंभीर आरोप केला आहे. यावरून मुख्यमंत्र्यांनी वाकचौरेंवर तुफान हल्ला चढविला. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मला एक अर्ज आला होता तो ठाकरे गटाच्या पदाधिकारी आहे. त्यात म्हटले आहे की,   भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure) हे माझ्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर करत असलेल्या अन्यायाबाबत मला न्याय पाहिजे. याबाबत मी चौकशी करणार आहे, असा इशारा त्यांनी यावेळी भाऊसाहेब वाकचौरेंना दिला आहे. 


जमीन हडप करणाऱ्यांना मतदान करणार की? सर्वसामान्य सदाशिव लोखंडेंना 


ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची संपूर्ण जमीनच हडपून घेतली आहे. म्हणून त्याच पक्षाचा कार्यकर्त्याने हे पत्र माझ्याकडे दिलेले आहे. मी हे पत्र जाहीरपणे आपल्यासमोर मांडत आहे. जमीन हडप करणारे, अन्याय करणारे सर्वसामान्यमाणसांना लुटणारे, असा उमेदवारांना आपण मतदान करणार? की सर्वसामान्य सदाशिव लोखंडे हे कधीही हाक मारली की, आपल्या हाकेला धावून येतात, त्यांना तुम्ही मतदान करणार? त्यामुळे लोखंडेंना मत म्हणजे मोदींना मत आहे, असे एकनाथ शिंदे म्हाणाले.  


जगभरात मोदींचा सन्मान केला जातोय


एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, शिर्डीत दहा वर्ष सदाशिव लोखंडे खासदार आहेत. आधी भाजप-सेना युती होती आता तर राष्ट्रवादी आणि मनसे सुद्धा महायुतीत सभागी झाले आहेत. अनेक जण आपल्या महायुतीत सहभागी झाल्याने आपली ताकद वाढली आहे. सगळीकडे महायुती व मोदींचा जयजयकार सुरू आहे. कारण दहा वर्षात अनेक विकास कामे करण्यात आली आहे.  पुढील 100 वर्षात विरोधकांना करता येणार नाही असा विकास मोदींनी केलाय. जगभरात मोदींचा सन्मान केला जात आहे. पूर्वी पंतप्रधान कुठे गेले तर समजत नव्हते. मात्र आता मोदींचा सन्मान केला जातो. 


एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंना टोला


लॉकडाऊन हा आघाडी सरकारमधील सर्वात आवडता विषय होता. घरात बसवून राज्य चालवता येत नाही. आम्ही उंटावरून शेळ्या हाकत नाही. फेसबुक लाईव्ह नाही तर फेस टू फेस काम केलं आहे. मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन केलं. अनेकांना रस्त्यावर पाळायला लावलं, मानेचा पट्टा काढला, अशी टीका त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर केली.  


हे देणारं सरकार, घेणारं नाही


1 रुपयात पीक विमा देणार आमचं पहिल सरकार आहे. महिलांना एसटीमध्ये सवलत दिली. आज परिवहन विभाग नफ्यात आला आहे. अनेक योजना आम्ही आणल्या आहेत. हे तुमचं सरकार आहे. शासन आपल्या दारी हा लोकाभिमुख प्रयोग आम्ही सुरू केला. सगळ्या योजना एकाच ठिकाणी दिल्या. हे देणारं सरकार आहे घेणारं नाही.  ही देणा बँक आहे लेना बँक नाही. निळवंडे धरणाच्या कालव्याचं 50 वर्ष रखडलेले काम महायुती सरकारने पूर्ण केलंय. 


एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींवर हल्लाबोल 


महविकास आघाडीकडे अहंकार आहे. तो त्यांना विनाशाकडे घेऊन जाईल. मोदी मोदी का करता. कारण एकही सुट्टी न घेता काम करणारा नेता आहे. दुसरीकडे राहुल गांधी थोड गरम झालं की परदेशात जातात व तिकडे आपल्या देशाची बदनामी सुद्धा करतात, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला. 


आणखी वाचा 


विरोधकांची 'लंका' दहन करा, नगरमध्ये मुख्यमंत्र्यांचा निलेश लंकेंवर हल्ला, सुजयचा विजय पक्का असल्याचा विश्वास!