मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) जागावाटपावर ठोस तोडगा काढता आलेला नाही. मविआमध्ये (MVA) काही जागांवरील वाद अद्याप मिटलेला नाही. दरम्यान, उद्धव ठाकरे यांची शिवसेना (Uddhav Thackeray Shivsena) 26 मार्च रोजी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहे. तशी माहिती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ठाकरेंच्या शिवसेनेच्या या पहिल्या यादीत एकूण 15 ते 16 उमेदवारांचा समावेश असू शकतो. याच उमेदवारांची संभाव्य यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे.


शिवसेनेच्या (ठाकरे गट) पहिल्या यादीत कोणत्या मतदारसंघांचा समावेश?


शिवसेना आपल्या पहिल्या यादीत कोणताही वाद नसणाऱ्या मतदारसंघांवर उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, ठाणे, परभणी, बुलढाणा, यवतमाळ या जागांचा समावेश असू शकतो. यासह वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आलेल्या छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, दक्षिण मुंबई, सांगली, मावळ या जागांवरही शिवसेना आपल्या उमेदवारांची घोषणा करू शकते. 


महाविकास आघाडीची आज निर्णायक बैठक 


दुसरीकडे महाविकास आघाडीची आज उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी निर्णायक बैठक होणार आहे. या बैठकीत मविआचे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी पाच वाजता ही बैठक पार पडणार आहे. शिवसेनेने उद्या (26 मार्च) आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची तयारी केलेली असताना या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेना सांगली जिल्ह्यातही आपला उमेदवार जाहीर करू शकते. या जागेवर काँग्रेसनेही दावा केलेला आहे. त्यामुळे अशा वादग्रस्त जागांवरही या बैठकीत ठोस निर्णय घेतला जाऊ शकतो. 


शिवसेनेचे संभाव्य उमेदवार


1. दक्षिण मुंबई- अरविंद सावंत
2. उत्तर पश्चिम मुंबई  - अमोल कीर्तीकर
3. उत्तर पूर्व मुंबई  - संजय दिना पाटील
4. दक्षिण मध्य मुंबई- अनिल देसाई
5. रायगड  - आनंद गीते
6. रत्नागिरी सिंधुदुर्ग- विनायक राऊत
7. ठाणे- राजन विचारे
8. धाराशिव- ओमराजे निंबाळकर
9. परभणी -संजय जाधव


10. सांगली -  चंद्रहार पाटील
11. मावळ- संजोग वाघेरे
12. शिर्डी- भाऊसाहेब वाकचौरे 
13. बुलढाणा- नरेंद्र खेडेकर
14. हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर
15.छत्रपती संभाजीनगर -चंद्रकांत खैरे 
16. यवतमाळ वाशिम संजय देशमुख


हेही वाचा >>>


मोठी बातमी! महाविकास आघाडीची 'मातोश्री'वर निर्णायक बैठक, जागावाटपावर तोडगा निघणार?


महादेव जानकरांना महायुतीचे तिकीट, आता मविआकडून नेमकं कोण? 'या' नव्या नावाची चर्चा!


सोलापूरचा भाजप उमेदवार ठरला, प्रणिती शिंदे आणि राम सातपुतेंमध्ये होणार लढत