नागपूर : काँग्रेसचे आमदार राजू पारवे (Raju Parwe) यांनी आपल्या आमदाराकीचा राजीनामा देऊन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला आहे. पक्षबदल करताच त्यांनी महाविकास आघाडीवर (Maha Vikas Aghadi) सडकून टीका केली आहे. राजू पारवे हे लोकसभा निवडणुकीत रामटेकमधून (Ramtek) महायुतीचे उमेदवार असतील, असे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी आपण कधी उमेदवारी अर्ज दाखल करणार, याबाबतही सविस्तर माहिती दिली आहे. ते 'एबीपी माझा'शी बोलत होते.
राजू पारवेंची महाविकास आघाडीवर सडकून टीका
राजू पारवेंनी महाविकास आघाडी, काँग्रेसवर कठोर शब्दांत टीका केली आहे. नागपूर जिल्ह्यात स्थानिक काँग्रेस नेत्यांची झुंडशाही हुकूमशाही सुरू आहे. त्याला मी कंटाळलो होतो. मी महाविकास आघाडी व महायुती यांची दोन्ही सरकारे बघितली. महाविकास आघाडीत विकास निधीला घेऊन खूप त्रास होत होता. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी विकासनिधीसाठी खूप मदत केली, असा दावा राजू पारवे यांनी केली.
'या' दिवशी अर्ज भरणार
राजू पारवे यांनी 24 मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृपाल तुमाने यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. लवकरच त्यांना महायुतीकडून रामटेक या मतदारसंघासाठी उमेदवारी दिली जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. यावरही पारवे यांनी भाष्य केलंय. मी भाजपचे नागपूरचे उमेदवार नितीन गडकरी यांच्यासोबतच येत्या 27 मार्च रोजी माझा उमेदवारी अर्ज भरणार आहे, असे त्यांनी सांगितले.
काँग्रेसकडून रश्मी बर्वे यांना तिकीट
दरम्यान, काँग्रेसने रामटेक या जागेवरून रश्मी बर्वे यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे येथे राजू पारवे विरुद्ध रश्मी बर्वे अशी लढत होणार आहे. रश्मी बर्वे यांच्या जात वैधता प्रमाणपत्रावर आक्षेप घेतल्यानंतर त्यांना उमेदवारी मिळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र तिकीट मिळाल्यानंतर त्यांनी प्रचाराला जोमात सुरुवात केली आहे. त्यामुळे या जागेवर नेमकं कोण जिंकणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
भाजपचाही रामटेकवर दावा
रामटेक हा मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहे. कृपाल तुमाने हे रामटेकचे खासदार आहेत. मात्र भाजपनेदेखील या जागेवर आपला दावा सांगितलेला आहे. मात्र पारवे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर आता भाजप आपला या जागेवरील दावा सोडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा >>
रिपाइं (ए) गट लोकसभेच्या रिंगणात; महाराष्ट्रासाठी विदर्भातील 9 उमेदवारांची यादी जाहीर
महादेव जानकरांना महायुतीचे तिकीट, आता मविआकडून नेमकं कोण? 'या' नव्या नावाची चर्चा!