सोलापूर : महायुतीने लोकसभेची (Mahayuti) एक जागा महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना देण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय घेऊन महायुतीने शरद पवारांवर (Sharad Pawar) एका प्रकारे मात केल्याचं बोललं जातंय. कारण माढा या जागेसाठी शरद पवार यांच्याकडून जानकरांचा विचार केला जात होता. तशी इच्छादेखील शरद पवारांनी बोलून दाखवली होती. मात्र जानकर महायुतीकडून निवडणूक लढवणार असल्यामुळे आता मविआकडून माढा जागेसाठी अन्य उमेदवाराचा शोध चालू आहे. मिळालेल्या माहितीनुसार या जागेसाठी महाविकास आघाडीकडून प्रा. रघुनाथ पाटील (Raghunath Patil) यांचा विचार केला जातोय.


माढ्यातून जानकरांना तिकीट देण्याचा पवारांचा होता विचार


माढा लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रातील बहुचर्चित मतदारसंघ आहे. कालपर्यंत महादेव जानकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असे खुद्द जानकर यांच्याकडून सांगितले जात होते. मात्र आता ते महायुतीत सामील झाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये माढा लोकसभेच्या उमेदवारीसाठी पुन्हा एकदा चुरस निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ही जागा धनगर समाजाला देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे यशवंत सेनेचे प्रदेश संघटक प्रा. रघुनाथ पाटील यांच्या नावाची आता चर्चा केली जात आहे. 


रघुनाथ पाटील कोण आहेत?


प्रा. रघुनाथ पाटील हे सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे शिष्य आणि शरद पवार यांचे खंदे कार्यकर्ते आहेत. प्रा. रघुनाथ पाटील यांनी धनगर समाजात गेली वीस वर्षे कुशल संघटक म्हणून काम केले आहे. एक तळागाळातील कार्यकर्ता म्हणून त्यांचा लौकिक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी त्यांची चर्चा चालू असल्याचे म्हटले जात आहे.


शरद पवार कोणाला संधी देणार?


यासह रघुनाथ पाटील हे मतदारसंघातील महत्त्वाच्या लोकांच्या भेटी घेत आहेत. याच सर्व घडामोडींमुळे रघुनाथ पाटील यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे या जागेवर शरद पवार नेमकी कोणाला संधी देणार, याची उत्सूकता सर्वांनाच लागली आहे. 


रासपला उमेदवारी पण मतदारसंघाची घोषणा नाही


ओबीसी मतांचा विचार करून शरद पवार यांच्याकडून माढा या जागेसाठी महादेव जानकर यांचा विचार केला जात होता. मात्र ऐनवेळी महाविकास आघाडीने त्यांना उमेदवारी दिली. जानकरांना कोणत्या जागेसाठी उमेदवारी दिली जाणार हे अद्याप ठरलेले नाही. मात्र एक जागा त्यांना दिली जाणार आहे, अशी घोषणा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे यांनी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांना परभणीतून तिकीट दिले जाऊ शकते.