मुंबई : सिनेसृष्टीत मोठं नाव असलेले अभिनेते गोविंदा आहुजा (Actor Govinda Ahuja) यांनी नुकतेच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला आहे. ते वायव्य मुंबई या मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान,सिनेसृष्टीतील एका सर्वपरिचित चेहऱ्याला पक्षात आणल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा राजकीय मास्टरस्ट्रोक असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, गोविंदा लोकसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता असताना ठाकरे यांच्या शिवसेनेने कुख्यात डॉन दाऊदचा उल्लेख करून शिंदे यांना डिवचलं आहे. 


दाऊदचा उल्लेख करून टीका


उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना खोचक सवाल केला आहे. ज्या गोविंदावर भाजपने दाऊदची मदत घेतल्याचा आरोप केला होता, त्या गोविंदाला पक्षात घेताना भाजपला नक्की विचारलंय ना? असं ठाकरेंच्या शिवसेनेने विचारलंय. ठाकरेंच्या शिवसेनेने दाऊदचा उल्लेख केल्यामुळे आता गोविंदा यांनी लढवलेल्या 2004 सालच्या लोकसभा निवडणुकच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. या निवडणुकीत गोविंदा यांनी जोमात प्रचार करून विजय खेचून आणला होता. या विजयानंतर गोविंदा यांनी निवडणुकीत दाऊदची मदत घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. विशेष म्हणजे त्यावेळी भाजपचे नेते राम नाईक यांनीच हा आरोप केला होता. 


नेमका आरोप काय होता? 


उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल आणि भाजपचे नेते राम नाईक यांनी गोविंदावर तेव्हा गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. 2004 सालच्या लोकसभा निवडणुकीत माझ्या पराभवासाठी गोविंदा यांनी कुख्यात डॉन दाऊद आणि बिल्डर हितेन ठाकुर यांची मदत घेतली होती, असा खळबळ जनक आरोप राम नाईक यांनी केला होता. 2006 साली नाईक यांच्या 'चरैवति चरैवति' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते. त्यांच्या या आत्मचरित्रात या आरोपांचा सविस्तर उल्लेख केला आहे. पुस्तकातील त्या आरोपांनंतर तेव्हा एकच खळबळ उडाली होती. 


राम नाईकांना केलं होतं पराभूत


दरम्यान, गोविंदाने 2004 साली काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून गोविंदा यांनी भाजपचे नेते राम नाईक यांना पराभूत केले होते. तेव्हा गोविंदा यांना साधारण 5 लाख 59 हजार मते मिळाली होती. तर राम नाईक यांना 5 लाख 11 हजार मते मिळाली होती. 


दाऊदचा मुद्दा काढून शिंदेंना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न


त्यानंतर आता गोविंदा यांनी पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात येण्याचा विचार केला आहे. त्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला असून ते लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. याच कारणामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने राम नाईक यांनी केलेल्या आरोपांचा उल्लेख करून शिंदे यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे.