Thane Lok Sabha Constituency : ठाणे : ज्या ठाण्यातून (Thane) शिवसेना (Shiv Sena) पक्ष झाला आणि महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन झालं, आज त्याच ठाण्याच्या लोकसभा (Thane Lok Sabha Election) जागेवरून शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) मध्ये एकमत होताना दिसत नाही. अजूनही ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजप आणि शिवसेना स्वतःकडे ठेवण्यासाठी आग्रही असल्यानं ठाण्याचा तिढा कधी सुटणार? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि स्वतःचे गुरुवर्य आनंद दिघे यांचा आशीर्वाद घेत, आज ठाण्यातून राजन विचारे यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. आनंद दिघे यांचे शिष्य असलेल्या राजन विचारे यांना महाविकास आघाडीकडून आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्,र दुसरीकडे आनंद दिघे यांचेच शिष्य असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला अजूनही ठाणे लोकसभा मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्यासाठी तडजोड करावी लागत आहे. भाजपची जागा स्वतःकडे ठेवण्यासाठी प्रचंड आग्रही असल्यानं अजूनही ठाण्याच्या जागेवर उमेदवार जाहीर करण्यात आलेली नाही.
ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला, पण भाजपचा दावा
ठाणे लोकसभा मतदारसंघ आकारमानानं मोठा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिकेचा 80 टक्के भाग तसेच, मीरा-भाईंदर महानगरपालिकेचा अर्धा भाग समाविष्ट आहे. या ठिकाणी 2014 पासून राजन विचारे हे दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्याआधी देखील शिवसेनेकडेच हा मतदारसंघ होता. सध्या या मतदारसंघात मंदा म्हात्रे, गणेश नाईक आणि संजय केळकर असे भाजपचे तीन आमदार तर प्रताप सरनाईक आणि स्वतः एकनाथ शिंदे असे सेनेचे दोन आमदार आहेत. तर गीता जैन या अपक्ष आमदार आहेत, ज्यांचा पाठिंबा भाजपला आहे, असा दावा भाजपचा आहे.
याच कारणास्तव भाजपचे आमदार जास्त आहेत. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील भाजपचे नगरसेवक जास्त आहेत, असं सांगून ठाण्याची सीट स्वतःकडे ओढण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस त्यासाठी आग्रही आहेत. तसेच, स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी देखील यावेळी लोकसभा लढवायचीच, असा निर्धार केला असल्याचं दिसून येत आहे.
ठाणे स्वतःकडे ठेवण्यासाठी एकनाथ शिंदेंचे अतोनात प्रयत्न
दुसरीकडे ठाणे जिल्हा हा आनंद दिघे यांच्या काळापासून शिवसेनेचा गड मानला जातो. एकनाथ शिंदे यांची देखील संपूर्ण जिल्ह्यावर चांगली पकड असल्यानं शिवसेना संघटना या जिल्ह्यात मजबूत आहे, त्यामुळेच ही सीट आमचीच, असा दावा शिवसेनेनं केला आहे. ठाणे लोकसभा मतदार संघातील तीन महानगरपालिकांपैकी ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. याचे कोणताही उमेदवार दिल्यास तो सहजासहजी शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडून येईल, असा विश्वास शिवसेनेला आहे. त्यामुळेच कोणाची ताकद किती हे न बघता, हे सीट स्वतःकडे ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे भरपूर प्रयत्न करत आहेत.
ठाण्याची जागा ही शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची जागा मानली जाते. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यापासून शिवसेनेची ताकद आधी पेक्षा कमी झाली असल्यानं भाजप ही सीट लढवण्यासाठी आग्रही आहे. पण जर ही सीट भाजपला दिली गेली तर शिंदे यांच्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जोरदार टीका केली जाईल, याचा अंदाज स्वतः एकनाथ शिंदे यांना देखील आहे. आतापासूनच ठाणे स्वतःकडे ठेवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यावर संजय राऊत यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.
जर ठाण्याची जागा भाजपच्या पारड्यात पडली, तर या जागेवर माजी खासदार संजीव नाईक आणि विद्यमान आमदार संजय केळकर यापैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता जास्त आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यातर्फे आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक किंवा एकनाथ शिंदे यांचे एकनिष्ठ असलेले नरेश मस्के यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता सांगितली जात आहे. मात्र अजूनही या जागेचा तिढा सुटलेला नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :