मुंबई : शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मुंबईतील मेळाव्यात बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) नाव न घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. विशेष म्हणजे, एक तर तू राहशील किंवा मी राहीन, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी इशाराही दिला होता. त्यानंतर, भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवारही केला. आता पुन्हा एकदा पुण्यातील (Pune) भाषणातून उद्धव ठाकरेंनी नाव न घेता देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis)लक्ष्य केलं. शिवसंकल्प चला जिंकूया.. या मेळाव्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी पुण्यात भाषण केलं.  


आता लढाई मैदानात आहे, मी मुंबईत म्हणालो की एक तर मी तर राहीन किंवा तू तरी राहशील. इथे एक पोस्टर लागलंय. त्यातील फोटोत माझ्या पायाशी एक कलिंगड ठेवलंय. काहींना वाटलं की मी त्याला आवाहन दिलेय. पण, ढेकणांना आवाहन द्यायचं नसतं तर बोटाने चिरडायचं असतं. मी आवाहन द्यावं इतका मोठा तू नाहीस. काहीजणांना वाटलं की मी त्याला आवाहन दिलेय. तर हे आवाहन चोर-दरोडेखोरांच्या पक्षाला आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी नाव न घेता भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केलीय. तसेच, मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे, मी म्हणजे संस्कारीत महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळक्यांचा पक्ष, असे म्हणत भाजपवरही निशाणा साधला.   


भाजपला सत्तेचा विकार


पुण्यातील नद्यांचे प्रवाह बदलण्याच्या त्यांचा प्रयत्न आहे. नदी सुशोभीकरण प्रकल्पाला आपल्या सत्तेच्या काळात स्थगिती दिली होती. पण, मोठ्या प्रमाणात नदीत राडारोडा टाकला जातोय. हा भाजपला झालेला सत्तेचा विकार आहे, असे म्हणत पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी पुण्यातील पूरस्थितीवरुन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. 



मुंबईत काय म्हणाले होते ठाकरे


आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस कशाप्रकारे डाव खेळत होते, हे मला अनिल देशमुख यांनी सांगितले. आता एक तर तू राहशील नाहीतर मी राहील, अशा शब्दांत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात दंड थोपटल्याचं दिसून आलं. बुधवारी मुंबईतील रंगशारदा सभागृहात झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविरुद्ध थेट 'आर या पारची' भूमिका घेतल्याने आगामी काळात ठाकरे गट आणि भाजपमधील संघर्ष आणखी तीव्र होत असल्याचे दिसून आले. आता, पुण्यातूनही ठाकरेंनी नाव न घेता फडणवीसांना लक्ष्य केलं.