Nagpur News नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपुरातील (Nagpur News) रेशीमबाग येथील संघ कार्यालयाला (Rashtriya Swayamsevak Sangh Headquarter) आज भेट दिली आहे. संघ कार्यालयातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची आज देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे संघाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत गेल्या पंधरा दिवसातली ही सलग दुसरी फडणवीसांची भेट आहे. राष्ट्रीय पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा असताना या भेटीला विशेष महत्त्व आले आहे. साधारण अर्धा तास या बैठकीत चर्चा झाल्याची ही माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची सर्वत्र चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी नाव चर्चेत असताना भेटीला विशेष महत्त्व
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे सध्या नागपूर येथील संघ कार्यालयात नसल्याची ही माहिती पुढे आली आहे. मात्र, त्यांच्या अनुपस्थित देवेंद्र फडणवीस हे संघातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन त्यांनी चर्चा केली आहे. साधारणतः अर्धा तासाच्या या भेटीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाल्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस हे चांगलेच सक्रिय झाले असून सध्या घडीला त्यांचे नाव राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे. त्याच अनुषंगाने गेल्या पंधरा दिवसातील ही दुसरी भेट असल्याचे देखील बोलले जात आहे. या एकंदरीत भेटी संदर्भात देवेंद्र फडणवीस हे नेमकी काय भूमिका मांडतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र आगामी निवडणूक आणि राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या नावासंदर्भात या भेटीला फार महत्त्व प्राप्त झाल्याचे देखील बोलले जात आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठीची राजकीय खलबतं?
सध्या घडीला राज्याचे राजकारण विविध मुद्द्यांनी अक्षरशः ढवळून निघाले आहेत. त्यात आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा इतर अनेक मुद्द्यावरील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी असेल, तसेच गेल्या लोकसभेच्या निकालानंतर भाजपची झालेली काहीशी पिछाडी लक्षात घेता, संघाची भूमिका येणाऱ्या निवडणुकांसाठी लक्षात घेणे हे फार महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे या अनुषंगाने पडद्यामागे काहीतरी खलबतं होत आहेत का, अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस हे सध्या राज्यात राहून इथल्या राजकीय परिस्थितीवर भाजप आणि महायुतीला विजय संपादन करून देतील, असा विश्वास भाजपच्या वरिष्ठांनी व्यक्त केला आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला पाठवण्याचे देखील बोलले जात आहे. मात्र यात नेमकी भाजपची भूमिका काय आणि पडद्यामागे काय राजकारण शिजतंय, हे अद्याप तरी स्पष्ट नसले तरी संघातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत झालेली देवेंद्र फडणवीस यांची भेट विविध अंगाने महत्त्वाची मानली जात आहे.