नाशिक : अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, असा गंभीर आरोप निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी (Sachin Vaze) केला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) पत्र लिहून सर्व माहिती दिल्याचे सचिन वाझेंनी म्हटले आहे. यावरून आता महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी आता यावरून अनिल देशमुख यांच्यावर पलटवार केलाय. अनिल देशमुख स्वतःची कातडी वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप करत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. अनिल देशमुख म्हणतात पेनड्राईव्ह आहे तो एकदा दाखवा, असे थेट आव्हानही गिरीश महाजनांनी दिले आहे.
गिरीश महाजन म्हणाले की, वाझेंनी केलेला आरोप केला हा आताचा नाही तो आधीचा आहे. त्यांनी याआधीही हा आरोप केला आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांना पुन्हा नोकरीत घेतले होते. त्यांना परत का घेतले? अनिल देशमुख म्हणतात पेनड्राईव्ह आहे तो एकदा दाखवा. माझ्या केसमध्ये एसपी मुंढे यांनी प्रेशर असल्याचे बोलले आहे. त्यात तथ्य आहे. अनिल देशमुख स्वतःची कातडी वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप करत आहेत. आता तुमचं बिंग फुटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप
सचिन वाझेंनी लिहिलेल्या पत्रात जयंत पाटील यांचे नाव असल्याचे वाझेंनी म्हटले आहे. याबाबत गिरीश महाजन म्हणाले की, त्यांनी काय पत्र लिहिले आहे हे मला नक्की माहित नाही. पण, त्यात नाव असेल तर त्याची चौकशी झालीच पाहिजे. कोणी कोणी काय काय कारनामे केले आहेत? किती पैशांच्या मागण्या केल्या? किती खंडण्या मागितल्या? स्वतःवरील आरोप सिद्ध होत असल्याने त्यांना आता यातना होत आहेत. म्हणून केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप करायचे, वाटेल तसे बोलायचे. अनिल देशमुख तुम्ही म्हणताय ना माझ्याकडे पेन ड्राईव्ह आहे दाखवा ना मग, असे थेट आव्हान गिरीश महाजन यांनी अनिल देशमुखांना दिले आहे. आमच्याकडचा पेन ड्राईव्ह आम्ही विधानसभेत दाखवला आहे. खोटे आरोप करण्याचे काम सुरू आहे. मात्र यात तेच फसले आहे. आता या प्रकरणी काय करायचे हे यंत्रणा ठरवतील. आमच्या विरोधात षडयंत्र रचण्यात आले होते, असेही त्यांनी म्हटले.
संजय राऊतांच्या जिभेला हाड नाही
सचिन वाझेंच्या आरोपानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला. ॲंटीलिया प्रकरणातील आरोपी कुठे आहेत. मुंबई पोलीस आयुक्तांना क्लीन चीट दिली आहे. आगामी निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा गुंडांचा वापर करते असा आरोप संजय राऊत यांनी केला. यावर गिरीश महाजन म्हणाले की, संजय राऊत भडक बोलतात. त्यांच्या जिभेला हाड नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.
आणखी वाचा