मुंबई : भाजपचे (BJP) विले पार्ले विधानसभा मतदारसंघाचे आमदार पराग अळवणी (Parag Alavani) यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यादरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यात भेट झाली. या भेटीदरम्यान काय घडलं हे समोर आलं आहे. विधानपरिषद आमदार मिलिंद नार्वेकर (Milind Narvkar) यांनी चंद्रकांत पाटील यांना मग युती कधी असा प्रश्न विचारला. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी मी सुद्धा या सुवर्णक्षणाची वाट पाहतोय असं उत्तर दिलं. यावेळी उद्धव ठाकरे देखील तिथं उपस्थित होते.
नेमकं काय घडलं?
भाजप आमदार पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नाला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली. ठाकरेंसोबत
आमदार मिलिंद नार्वेकर, माजी खासदार विनायक राऊत हे उपस्थित होते. शुभेच्छा देऊन ठाकरे निघाले असताना भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील तिथं दाखल झाले. यावेळी भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे आमने सामने आले. यावेळी तिथं उपस्थित असलेल्या मिलिंद नार्वेकर यांनी चंद्रकांत पाटील यांना मग युती कधी? असा प्रश्न विचारला. यावर चंद्रकांत पाटील यांनी मी या सुवर्णक्षणाची वाट पाहतोय, असं उत्तर दिलं. या उत्तरानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांनी एकमेकांना नमस्कार केला.
भाजप अन् ठाकरेंच्या शिवसेनेत जवळीक वाढत असल्याच्या चर्चा
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटीचा फोटो समोर आल्यानंतर चर्चांना सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूरमधील भेट असो, त्याशिवाय आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या घेतलेल्या भेटीनंतरच्या आजच्या फोटोनं भाजप आणि शिवसेना ठाकरे पक्षामध्ये जवळीक वाढतेय का अशा चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नात झालेल्या भेटीत उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात युतीची चर्चा हसत खेळत चर्चा केली असली तरी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना नमस्कार केला.
राजकीय समीकरण बदलणार
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर आता येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसदर्भातील सुनावणी आता 25 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात होणार आहे. त्या सुनावणीनंतर निवडणुका जाहीर होणं अपेक्षित आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका सर्वच प्रमुख पक्षांनी आघाडी करुन लढवल्या असल्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्व प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात नवं राजकीय समीकरण पाहायला मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
इतर बातम्या :