Eknath Shinde on Uddhav Thackeray : "आम्ही 2022 मध्ये गुवाहाटीला गेलो, तो आमच्या रणनितीचा भाग होता. त्यावेळी मला उद्धव ठाकरेंचा फोन आला होता. मी रस्त्यात असताना त्यांच्याशी बोलत होतो. तुम्ही येऊन दाखवा, लाखो लोक रस्त्यावर उतरतील. तुम्हाला वरळीतूनचं जायचं आहे, अशा धमक्याही दिल्या होत्या. अरे धमक्या कोणाला देता? मी कोणाला घाबरत नाही", असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले. ते एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीवेळी बोलत होते.
स्वत:ला मुख्यमंत्री व्हायचं असेल तर भाजपशी युती ठेऊन चालणार नाही
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, भाजपने उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही शब्द दिलेला नव्हता. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मला सांगितलं की, मित्र पक्षाला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्यात कोणतीही अडचण नव्हती. अनेक राज्यात मित्र पक्षांचे जास्त आमदार निवडून आले तरिही आपण त्यांना मुख्यमंत्रिपद देण्याचे प्रयोग केले. उद्धव ठाकरेंना माहिती होतं की, स्वत:ला मुख्यमंत्री व्हायचं असेल तर भाजपशी युती ठेऊन चालणार नाही, त्यामुळेच त्यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला.
50 आमदार सोडून का जातात? लाखो कार्यकर्ते का जातात?
पुढे बोलताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, विधानसभा निवडणुकीआधी भाजपशी युती होती. निकालानंतर मुख्यमंत्री बनण्यासाठी उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षांसोबत गेले. लोकांनी सेना-भाजप युतीला मतदान केले होते. पक्ष कशामुळे फुटतो? 50 आमदार सोडून का जातात? लाखो कार्यकर्ते का जातात? याचे आत्मपरिक्षण करायला हवे, असंही एकनाथ शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.
मराठा समाजाचा महाविकास आघाडीकडून राजकीय वापर
राज्यातील मराठा समाज आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार होते, तेव्हा त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते. त्यावेळी आरक्षण उच्च न्यायालयातही टिकले होते. मात्र, त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले. त्याकाळात सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवता आले नाही. महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची बाजू योग्यरित्या सुप्रीम कोर्टात मांडली नाही. आमचे सरकार आल्यापासून आम्ही सुप्रीम कोर्टात मराठा समाज कसा मागासलेला आहे? हे सांगण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत,असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
इतर महत्वाच्या बातम्या
Eknath Shinde : 'उद्धव ठाकरे तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं, तर मला एका शब्दाने सांगायचं होतं', एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य