Eknath Shinde on Uddhav Thackeray, मुंबई : "महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायचं हे उद्धव ठाकरेचं अनेक वर्षांपासूनचे स्वप्न होतं. तेव्हा मी त्यांना म्हणालो ही होतो की, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं तर मला एका शब्दाने सांगायचं होतं. तुम्ही सांगितलं असतं तर आम्ही वातावरण तयार केलं असतं. तुम्ही म्हणाले की व्हायचं नाही. त्यानंतर तुम्ही म्हणालात की, शरद पवार म्हणाले तुम्हीच मुख्यमंत्री व्हा" असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) म्हणाले. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 


एकनाथ शिंदे काय काय म्हणाले ?


एकनाथ शिंदे म्हणाले, मी नरेंद्र मोदींचे नेतृत्व देशाला पुढे घेऊन जात आहे, विकास होतोय. राज्यात अजित पवार आमच्यासोबत आले आहेत. ते आमच्यासोबत काम करत आहेत. लोकांना जलद गतीने चांगले निर्णय हवे आहेत. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री बनण्याबाबत सर्वकाही गुपित ठेवलं होतं. विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांनी आमच्यासाठी सर्व दरवाजे खुले आहेत, असं वक्तव्य केलं. आम्ही गुवाहाटीला गेलो, ती आमची रणनिती होती. त्यावेळी मला उद्धव ठाकरेंचा फोन आला होता. मी रस्त्यात असताना त्यांच्याशी बोलत होतो. तुम्ही येऊन दाखवा, लाखो लोक रस्त्यावर येतील. वरळीतूनच तुम्ही जायचं आहे, अशा धमक्याही त्यांनी मला दिल्या. अरे धमक्या कोणाला देता? मी कोणाला घाबरत नाही. 


भाजपने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रि‍पदाबाबत कोणताही शब्द दिलेला नव्हता


पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले,  भाजपने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचं कोणतही आश्वासन दिलं नव्हतं. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मला सांगितलं की, मित्र पक्षाला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्यात कोणतीही अडचण नव्हती. अनेक राज्यात मित्र पक्षांचे जास्त आमदार निवडून आले तरिही आपण त्यांना मुख्यमंत्रिपद देण्याचे प्रयोग केले. उद्धव ठाकरेंना माहिती होतं की, मुख्यमंत्री व्हायचं असेल तर भाजपशी युती ठेऊन चालणार नाही, त्यामुळेच त्यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. विधानसभा निवडणुकीआधी भाजपशी युती होती. निकालानंतर मुख्यमंत्री बनण्यासाठी उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षांसोबत गेले. लोकांनी सेना-भाजप युतीला मतदान केले होते. पक्ष कशामुळे फुटतो? 50 आमदार सोडून का जातात? लाखो कार्यकर्ते का जातात? याचे आत्मपरिक्षण करायला हवे, असंही एकनाथ शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या 


मोठी बातमी : लाडकी बहीण योजनेचे पैसे हळूहळू 3 हजार करणार, मुख्यमंत्र्यांची नवी घोषणा