मुंबई: नरेंद्र मोदींची पंतप्रधान म्हणून मुंबईतील शेवटची सभा असून त्यानंतर मोदी हे पंतप्रधान राहणार नाहीत, 4 जून नंतर ते झोळी घेऊन निघून जातील, नंतर तुमचं काय होणार असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपच्या नेत्यांना विचारला आहे. गेल्या दहा वर्षांत मोदींनी झोप न घेतल्याने त्यांचा मेंदू आता क्षीण झाला आहे, भाजपने या काळात नवीन नेतृत्व तयार केलं नाही असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांनी 'एबीपी माझा'शी खास संवाद साधताना भाजपवर टीका केली.


भाजपसोबत असणारे सगळेच हिंदुत्ववादी आहेत का?


उद्धव ठाकरे म्हणाले की, "शिवसेनेने हिंदुत्व सोडले असल्याचा आरोप करणाऱ्या भाजपसोबत असलेले इतर नेते, नितीश कुमार आणि चंद्राबाबू हे हिंदुत्ववादी आहेत का याचं उत्तर भाजपने पहिला द्यावं. खोटं कोण बोलतंय हे जगाने पाहिलंय. 2019 साली  मोदींनी म्हटलेलं की शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार होते, सर्वांना घरं देणार. आता ही त्यांची जुमलेबाजी. त्यांना माझा जय भवानी हा शब्दही चालत नाही."


मोदींचं कॉन्ट्रक्ट आता संपलंय


देश आता मोदींच्या हातात द्यायचं कारण नाही, त्यांचं कॉन्ट्रॅक्ट संपलंय असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते म्हणाले की, 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, आदर्श घोटाळा झाल्याचा आरो, इक्बाल मिर्ची आणि विमान घोटाळा असे अनेक आरोप कोण केलेले? मोदींनी आता त्यांनाच सोबत घेतलं आहे. मोदींच्या मेंदूला क्षीण आलेला आहे. 4 जूननंतर मोदी पंतप्रधान राहणार नाहीत. मोदींना आता 75 वर्षे पूर्ण होणार आहेत, त्यामुळे भाजपकडे दुसरा चेहरा नाही. गेल्या 10 वर्षात तर भाजपने नेतृत्व तयार केलं नाही. 400 पार म्हणत असाल तर तुम्ही इतर पक्ष का फोडताय? 


एकनाथ शिंदे भाजपमध्ये विलीन होणार


शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार अशी टीका भाजपने केल्यानंतर त्याला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, शिवसेना गेली 30 वर्षे भाजपसोबत होती, म्हणून काय मी माझा पक्षा त्यांच्यात विलीन केला का? शरद पवारांनी जे वक्तव्य केलंय ते लहान लहान प्रादेशिक पक्षांबद्दल होतं. एकनाथ शिंदे यांचा पक्षच 4 जूननंतर भाजपमध्ये विलीन होणार आहे. 


आजही शिवसेनेची ताकद आणि कार्यकर्ते हे माझ्यासोबत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपला स्वतःची पोरं होत नाही, म्हणून इतरांना फोडावं लागतंय. आजचा भाजप हा संपलेला भाजप आहे अशी टीका त्यांनी केली. 


मोदी आता थकलेत, त्यांना आरामाची गरज


नकली शिवसेना, नकली संतान असा मोदींनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "मोदी सुद्धा माणूस आहेत. गेली 10 वर्षे ते झोपले नाहीत असं म्हणतात. त्यामुळेच त्यांच्यावर मानसिक परिणाम झाला आहे, त्यांचा मेंदू क्षीण झाला आहे. असं असूनही भाजपकडून पुन्हा मोदींना तिसऱ्यांदा बोहल्यावर चढवण्याची तयारी सुरू केली आहे. मोदीपण माणूसच आहेत, ते थकणारच ना? त्यांच्या मेंदूला ताण पडला असल्याने 2014 आणि 2019 साली त्यांच्या पंतप्रधानपदासाठी मी सही केली होती, शिंदेंनी नाही हे मोदी विसरलेत. मोदी एकदा म्हणतात की उद्धव ठाकरेंना मदत करतो, दुसऱ्या दिवशी म्हणतात की नकली संतान. त्यामुळे त्यांच्या मेंदूला क्षीण आला असून त्यांना आता आरामाची गरज आहे."


आम्हाला नकली शिवसेना म्हणत असाल तर महाराष्ट्रात एवढ्या सभा का घेता असा सवाल उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना विचारला. औरंगजेब महाराष्ट्रात 25 वर्षे होता, आता मोदीही उद्या 25 वी सभा महाराष्ट्रात घेत आहेत. याचा अर्थ महाराष्ट्राने त्यांना गुढघे टेकायला लावले आहेत. 


ही बातमी वाचा: 


Uddhav Thackeray Exclusive : पंतप्रधान म्हणून मोदींची मुंबईत शेवटची सभा असेल, शिंदे भाजपमध्ये विलीन होतील : उद्धव ठाकरे