मुंबई : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना लोकसभेसाठी युतीचा प्रस्ताव दिला होता, पण त्यांनी तो अमान्य केला, असं असलं तरी विधानसभेला त्यांच्याशी युती होऊ शकते असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले. येत्या काळात शिंदेंच्या ताब्यात असलेल्या शिवसेनेचे प्रमुखपद हे राज ठाकरे यांच्याकडेही जाऊ शकेल असं मला वाटतं असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांनी एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा या कार्यक्रमात हे वक्तव्य केलं. 


मनोज जरांगे यांच्यासोबत युतीची शक्यता


प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "मनोज जरांगेंसोबत लोकसभेला वंचितची युती झाली नसली, तरी विधानसभेला होऊ शकते. मनोज जरांगे यांना लोकसभेसाठी आघाडीचा प्रस्ताव दिला होता. मात्र औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे यांच्या कार्यकर्त्यांनी मारामारी केली. त्यामुळे जरांगे पाटील बॅकफूटवर गेले आणि प्रत्येक मतदारंसघात अशी मारामारी होईल अशी शक्यता त्यांना वाटली. त्यामुळे त्यांनी निरोप पाठवला की आता मी थांबतोय. आपण पुन्हा विधानसभेला बघू. त्यामुळे विधानसभेला त्यांच्यासोबत युती होऊ शकते."


प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?


मला कुठेतरी जाणवायला लागलंय की एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे सध्या अध्यक्ष असले तरी नजीकच्या काळात राज ठाकरे हे अध्यक्ष होतील अशी शक्यता आहे. जी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे त्या शिवसेनेचे अध्यक्ष राज ठाकरे होऊ शकतात. आफ्टर लोकसभा आणि बिफोर विधानसभा, राज ठाकरे हे मनसे विलीन करुन अध्यक्ष होणार का किंवा शिवसेना पक्षप्रमुखपद हे राज ठाकरे यांच्याकडे जाणार असं काहीसं मला जाणवायला लागलं आहे.   


राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कात भाषण करुन आपण शिवसेनेचे अध्यक्ष होणार नाही हे जरी सांगितलं असलं तरी त्याचा अर्थ होय असाच आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.  


भाजपचा जो गेमप्लॅन आहे  तो समजला पाहिजे. मोदी  म्हणाले उद्धव ठाकरेंची परिस्थिती वाईट झाली तर आम्ही त्यांना मदत करु,  असं म्हणून त्यांनी गाजर दाखवलं आहे. दुसऱ्या बाजूने एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांना भाजपने प्रचारात घेऊन, हळूवारपणे मेन रजिस्टर शिवसेना जी एकनाथ शिंदेंकडे आहे, ती देण्याचा घाट तरी घातला नाही ना असा प्रश्न आहे. यावर सर्वायवल कोणाचं राहणार हे पाहावं लागेल. इंडिकेट सिंडिकेट काँग्रेस झाली होती त्यावेळी इंदिरा गांधींची काँग्रेस वाचली. अशा परिस्थितीत उद्या राज ठाकरे अध्यक्ष झाले तर त्यांच्यात आणि उद्धव यांच्यात सर्वायवलची चुरस लागेल.त्या चुरशीत कोण तग धरेल हे बघावं लागेल. 


ही बातमी वाचा: