मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून उघड-उघड हिंदुत्वाचा प्रचार सुरु आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदी-शाहांचा व्हिडीओ दाखवला. हिंदुत्वाचा प्रचार करणाऱ्या मोदी-शाहांवर कारवाई का नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. मध्य प्रदेश, कर्नाटक निवडणुकीच्या वेळी निवडणूक आयोगाकडे आणखी विचारणा केली होती, पण त्यावर उत्तर आलेलं नाही, असं उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.
उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाची नोटीस धुडकावली
मशाल गीतात "भवानी" शब्द आल्याने निवडणूक आयोगाने नोटीस पाठवत हा शब्द हटवण्यास सांगितलं आहे. या संदर्भात आज उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मशाल गीतातील भवानी शब्द हटवणार नसल्याचं स्पष्ट सांगितलं आहे. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाची नोटीस धुडकावली आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.
मोदी-शाहांकडून हिंदुत्वाचा प्रचार
आमचं सरकार आणल्यावर प्रभू श्रीरामाचं दर्शन मोफत करु, असं अमित शाह म्हणाले. बजरंग बलीचं नाव घेत पंतप्रधान मोदींनी प्रचार केला. हिंदुत्वाचा प्रचार करणाऱ्या मोदी-शाहांवर आधी कारवाई करा, असं उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला उद्देशून म्हटलं आहे.
मोदी आणि शाहांवर आधी कारवाई करा
भवानी माता सर्व जनतेची माता आहे, तिचं स्मरण करण्यापासून आम्हाला कुणी रोखू शकत नाही. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे. आमच्या गीतातून धार्मिक प्रचार होत असेल, तर मोदी आणि शाहांच्या धार्मिक प्रचार करणाऱ्या वक्तव्यावर आधी कारवाई करा, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिलं आहे.
उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल
मोदी-शाहांना हवं ते बोलता येतं, मग आम्हाला का नाही. मोदी बजरंग बली की जय म्हणत बटण दाबा म्हणतात, शाह म्हणतात आम्हाला निवडून दिलं तर, रामलल्लाचं मोफत दर्शन देऊ. निवडणुकीत धर्माच्या नावाने मते मागता येत नाहीत, मग मोदी-शाहांना वेगळा नियम का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.
Uddhav Thackeray Full PC : उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?