रायगड : रायगड जिल्हा हा एकेकाळी ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला,मात्र एकही आमदार आज या पक्षाला आपल्याकडे ठेवता आलेला नाही. रायगड जिल्ह्यातील राजकारणात झालेली उलथा पालथ आणि त्यानंतर मागील दोन वर्षापूर्वी सत्तेत झालेला बदल याला कारणीभूत ठरल्याचं चित्रं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन करण्यासाठी फोडलेली शिवसेना आणि त्यानंतर कार्यकर्त्यामध्ये झालेला संभ्रम या बदलामुळे अनेक कार्यकर्ते हे सुरुवातीला ठाकरेंच्या शिवसेनेत राहण्यास पसंती देत होते. मात्र कालांतराने सरकार स्थिर राहिल्याने अनेक जुने कार्यकर्ते ठाकरे गटातून बाहेर पडू लागलेत.
विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटासमोर मोठं आव्हान असणार
रायगड जिल्ह्यात शिंदेंचे एकूण तीन आमदार आहेत आणि त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेच्या ताकदीचा या जिल्ह्यात दबदबा असल्याने अनेक संभ्रमात आहेत. तेच कार्यकर्ते आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताना दिसत आहेत. त्यामुळे आगामी काळात येऊ ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटासमोर मोठं आव्हान असणार आहे. मुरुडमधील ठाकरे गटाचे रायगड जिल्हा युवासेना उपजिल्हाप्रमुख यांनी सुध्दा आज ठाकरे गटाला रामराम ठोकत शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश केलाय.
परेश किल्लेकर किल्लेदार यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
परेश किल्लेकर हे रायगडमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख म्हणून कामगिरी सांभाळत होते. त्यांच्या या प्रवेशामुळे ठाकरे गटाचे मुरुडमधील बुरुज ढासळल्याचे चित्र आहे. रायगड मधील अलिबाग मुरूड मतदारसंघात सध्या शिंदेच्या महेंद्र दळवी यांचा करिश्मा आहे. शेकापचा बालेकिल्ला असणारा हा गड महेंद्र दळवी यांनी पहिल्यांदा शिवसेनेकडे आणला आणि पहिल्याच टर्ममध्ये उबाठा गटाकडून आमदार बनलेले आमदार महेंद्र दळवी यांना शिंदेच्या शिवसेनेत जावं लागलं. मात्र पुढील काल हा कसा असेल शिवाय इकडून तिकडे उड्या मारणारे हे कार्यकर्ते शेवटपर्यंत दळवी यांना कितपत साथ देतील हे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूक काळातच कळेल.
इतर महत्वाच्या बातम्या