बुलढाणा : अलीकडे तलवार, चाकू किंवा कुकरी घेऊन केक कापणे ही फॅशन बनली आहे. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधी किंवा त्यांच्या निकटवर्तीयांकडूनच असे प्रकार सर्रास घडताना पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटातील नेते आणि बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी तलवारीने केक कापून सहकारी व इतरांना तलवारीनेच केक भरविल्याचा इव्हेंट घडला होता. मात्र, आता हेच प्रकरण आ.संजय गायकवाड यांच्या अंगलट आलं असून आमदार महोदयांसह इतर तिघांवर देखील बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


मुंबई पोलीस कायदा 135 अन्वये कलम 37 (1) (3) नुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. आ.संजय गायकवाड यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या चिरंजीवांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हजारो नागरिकांसमोर तलवारीने केक कापून सेलिब्रेशन केलं होतं. यावेळी, आपल्या पत्नीला व इतरांना त्यांनी चक्क तलवारीनेच केक भरवला होता. याप्रकरणी पोलिसांनी सुमोटो घेत सार्वजनिक ठिकाणी शस्त्र प्रदर्शन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी.बी.महामुनी यांनी याबाबत एबीपी माझाला एक्स्क्लुझिव माहिती दिली आहे. 


बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांचे सुपुत्र मृत्युंजय गायकवाड यांचा बुलढाण्यात धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड यांनी भल्या मोठ्या तलवारीने स्टेजवर केक कापला आणि कापलेला केक तलवारीनेच त्यांनी हा केक आपल्या सुविध्य पत्नी यांना भरविला. या सर्व कार्यक्रमाचे व्हिडिओ सध्या समाज माध्यमात आता जोरदार व्हायरल झाले आहेत. मात्र, सामान्य व्यक्तीने तलवारीने केक कापल्यास त्या व्यक्तीवर आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल होतो. पण, आता शिंदेंच्या शिलेदाराने तलवारीने केक कापून त्यास तलवारीने आपल्या सुविध्य पत्नी पूजा गायकवाड आणि मुलांना केक भरवल्याचा व्हिडिओ समोर आल्याने सुजाण नागरिकांनी व विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांच्यावर बुलढाणा पोलीस नेमकी काय कारवाई करतात, असा प्रश्न उपस्थित होत होता. अखेर, पोलिसांनी सुमोटो घेत आमदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 


संजय गायकवाड म्हणाले हा गुन्हा होऊ शकत नाही


दरम्यान, याप्रकरणी विरोधकांनी देखील आमदार संजय गायकवाड यांच्यावर टीकेची झोड उठवत जोरदार हल्लाबोल केला होता. तर, या प्रकरणावर संजय गायकवाड यांनी भाष्य करत आपल्या कृत्याची स्पष्टोक्ती दिली. तलवारीने केक कापणे हा गुन्हा होऊ शकत नाही. तलवारीने केक कापतानाचा हेतू कुणाला इजा पोहचवण्याचा नाही. त्यामुळे यावर गुन्हा दाखल करणे चुकीचे असल्याचे संजय गायकवाड यांचे म्हणणे होते. नेत्यांना तलवार देणं म्हणजे मर्दांगीचे प्रतीक आहे. पोलीस परेड वेळी सुद्धा पोलीस तलवार दाखवतो, मग तो काय लोकांना धमकावतो का? ऑलिंपिक मधील तलवार बाजीचां गेम सुद्धा बंद करणार का? आमच्या पुर्वजांपासून आम्ही तलवार चालवतो, त्यामुळे आम्ही तलवार वापरणार. चुकीचा वापर केला असेल तर गुन्हा होऊ शकतो. मात्र, अशाप्रकारे तलवार दाखवणे म्हणजे गुन्हा नसल्याचा अजब दावा देखील आमदार संजय गायकवाड यांनी केला होता. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.