सातारा : राज्यातील महाविकास आघाडीचं चुकून स्पेलिंग मिस्टेक झालं असून ते महाभकास आघाडी असल्याची टीका साताऱ्यातील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केली. काँग्रेसने या आधी फक्त सत्ता भोगली आणि लोकांची कामं केली नाहीत, पण मोदी (Narendra Modi) सत्तेत आले आणि त्यांनी शेतकरी आणि मजुरांसाठी अनेक योजना लागू केल्या असंही उदयनराजे म्हणाले. नरेंद्र मोदी यांना दैवी शक्ती लाभली आहे, त्यांच्या कामात अनेक बारकावे असतात अशीही स्तुतीसुमनं उधळली. 


काँग्रेसने फक्त घोषणा दिल्या


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उदयनराजे यांच्या प्रचारार्थ साताऱ्यात सभा झाली. त्यावेळी उदयनराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करत काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले की, देशात नव्हे तर जगभरात सर्वात मोठा पक्ष म्हणजे भाजप आहे. काँग्रेसच्या काळात फक्त निवडणुकीसाठी गरिबी हटाव सारख्या घोषणा देण्यात आल्या. पण मतदान झाल्यानंतर त्यांनी मतदारांकडे पाठ फिरवली. त्या घोषणांची अंमलबजावणी ही नरेंद्र मोदींनी केली.


देशाची सुरक्षा ही नरेंद्र मोदींमुळे 


आज देशाची सुरक्षा ही नरेंद्र मोदींमुळे असल्याचं उदयनराजे म्हणाले. ते म्हणाले की, देशातला शेतकरी आज सुखी आणि सक्षम आहे तो नरेंद्र मोदींमुळे. मोदी हेच देशाचं उज्ज्वल भविष्य आहेत. नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवरायांचे विचार अंमलात आणले. जगभरात आज देशाचं नावलौकीक झालं ते फक्त मोदींमुळे. दुसऱ्या बाजूला काँग्रेस आहे. देशाचा पंतप्रधान कोण असावा यावर विरोधकांच्या आघाडीमध्ये वाद होतोय. 


महाविकास आघाडी नव्हे तर महाभकास आघाडी


राज्यात महाविकास आघाडी नव्हे तर महाभकास आघाडी असल्याची टीका उदयनराजे यांनी केली. ते म्हणाले की. महाविकास आघाडीमध्ये अस्थिरता आणि नियोजनाचा अभाव आहे. त्यामुळे प्रगतीच्या मार्गाने नव्हे तर अधोगतीच्या दिशेने वाटचाल असल्याची दिसतेय.  मोदींच्या रुपात आज स्थिर सरकार मिळालंय. यावेळी सर्वाधिक उच्चांक घेऊन ते सत्तेत येणार. 


आजपर्यंत लोकांनी काँग्रेसला मतदान केलं, फक्त सत्तेत येण्यासाठी काँग्रेसने मतं मागितली. पण त्यांनी मूलभूत पाण्याचा प्रश्न कधीही सोडवला नाही असं उदयनराजे म्हणाले. ते म्हणाले की, शेतीचा प्रश्न आणि शेतकऱ्यांचा प्रश्न जर सोडवला असेल तर तो भारतीय जनता पार्टीने. या भागात एकही आमदार खासदार नसताना भाजपने कृष्णा खोरे महामंडळ सुरू केलं.


उदयनराजे म्हणाले की, ज्यावेळी विकास कामांवरती बोलता येत नाही तर त्यावेळी संविधान बदलणार असल्याची भीती दाखवली जाते. हे संविधान कुणीही बदलू शकत नाहीत. संविधानाचा पार खात्मा हा काँग्रेसने केला. इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लावली होती. पण त्याउलट नरेंद्र मोदी आहेत. लोकांना केंद्रबिंदू ठेऊन मोदी काम करत आहेत. 


ही बातमी वाचा: