सोलापूर: गेल्या 60 वर्षांचा काँग्रेसचा काळ तुम्ही पाहिलाय, आता मोदींची दहा वर्षे पाहिली, गेल्या 10 वर्षांत जे काम झालं ते मागील 60 वर्षांमध्ये झालं नसल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केला. या आधी मी सोलापुरात काहीतरी देण्यासाठी आलो होतो, आता काहीतरी मागायला आलोय असं नरेंद्र मोदी म्हणाले. अहमदाबादमध्ये असताना मी पद्मशाली समाजाचं मीठ खाऊन मोठा झालोय असं सांगत त्यांनी सोलापुरातील पद्मशाली समाजाचं (Panchamasali Caste) आभारही मानलं. सोलापुरचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी ते सोलापुरात आले होते. 


मी आता काहीतरी घेण्यासाठी आलोय


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मी 2024 मध्ये दुसऱ्यांदा सोलापुरात येतोय, हे सोलापूरकरांचे प्रेम आहे. मी जानेवारीत आलो तेव्हा काही घेऊन आलो होतो, आता मात्र तुमच्याकडे काही मागायला आलोय. काँग्रेसने देशाला भ्रष्टाचारमध्ये ढकलेलं होतं. तुम्ही दहा वर्षाच्या मोदींच्या कार्याला पाहिलेलं आहे, प्रत्येक गोष्ट तपासून पहिली आहे. इंडी आघाडीत मात्र नेत्याच्या नावावर युद्ध सुरु आहे. इतक्या मोठ्या देशात ज्याचे नाव, ज्याचा चेहरा अजून फिक्स नाही त्यांच्या हातात कोण देईल का? चुकून तरी देईल का? 


नरेंद्र मोदी हे विरोधकांच्या इंडिया आघाडीवर टीका करताना म्हणाले की, सत्ता मिळवण्यासाठी विभाजन केलं, आता नवीन फॉर्म्युला यांनी आणला आहे. दरवर्षी नवीन पंतप्रधान, पाच वर्षात पाच पंतप्रधान आणायची यांची रणनीती आहे. दरवर्षी नवीन पंतप्रधान येणार आणि देशाला लुटणार, मग दुसरा येणार. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला लगावताना म्हणाले की, नकली शिवसेनावाले म्हणतात आमच्याकडे पंतप्रधानपदासाठी अनेक नेते आहेत. एक बोलघेवढा नेता तर म्हणाला एकाच वर्षात आम्ही चार पंतप्रधान केले तर काय बिघडतं? असा कसा देश चालवतील तुम्हीच सांगा. त्यांना देश चालवायचा नाही तर त्यांना केवळ मलई खायची आहे. 


पद्मशाली समाजाचं मीठ खाऊन मोठा झालोय


महाराष्ट्र सामाजिक समतेची धरती आहे. काँग्रेसच्या साठ वर्षाचा काळ देखील आपण पहिलाय, मोदींचे दहा वर्षे सेवेचे देखील तुम्ही पाहिली. मागच्या दहा वर्षात जे काम झालं ते मागच्या साठ वर्ष कधीच झालेलं नाही. अहमदाबादमध्ये पद्मशाली समाज मोठ्या प्रमाणात होता, मी त्यांचे मीठ खाऊन मोठा झालोय. त्यांचे ऋण फेडण्याचे प्रयत्न मी एकप्रकारे करतोय. 


कोणाचाही हक्क न काढता आम्ही सामान्य वर्गातील गरीब लोकांना न्याय देण्यासाठी दहा टक्के आरक्षण दिलं. यामुळे देशातील कोणतीही आग लागली नाही, उलट दलित नेत्यांनी स्वागत केलं. 


मराठी भाषेत शिकलं की संधी मिळणार नाही असं या आधीच्या सरकारने सांगितलं होतं. आम्ही सांगितलं की मराठी शिकला तरी डॉक्टर बनता येईल असं नरेंद्र मोदी म्हणाले. 


डॉ. आंबेडकर आले तरी संविधान बदलणार नाही


डॉ.आंबेडकरांपासून अनेक नेत्यांचा अपमान काँग्रेसने केला. त्यांना भारतरत्न देखील देताना भाजपने पाठिंबा दिलेला. त्यावेळी देशात काँग्रेस विरोधी सरकार होते. तुम्ही बहुमत दिलं आणि दलितच्या मुलाला राष्ट्रपती बनवलं, आदिवासी मुलीला पहिल्यांदा राष्ट्रपती बनवले. एससी, एसटी सर्वांत जास्त नेते भाजपमधून निवडून येतात. 60 टक्क्यांपेक्षा जास्त लोक केंद्रात मंत्री आहेत, ते याचं वर्गातून येतात. ओबीसी प्रतिनिधित्व नावाखाली खोटं पसरवण्याचे काम काँग्रेस करतेय. संविधान बदलणार, आरक्षण संपवणार असे खोटं बोलतायत. स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर देखील आरक्षण संपवणार नाहीत, मोदी तर दूरची गोष्ट आहे. 


ओबीसी, एससी-एसटी आरक्षण काढणार नाही


पाच वर्षाच्या काळात मोदीजवळ जेवढे हवे तेवढे मतं आहेत, पण हा रास्ता आम्हाला मान्य नाही. आमच्या पूर्वजानी पाप केलं असतील, त्याचे प्रायश्चित करण्याची ही वेळ आहे. एसटी, एससी, ओबीसी आरक्षणमध्ये लूट करून अल्पसंख्यांकांना द्यायचे आहे. मला काँग्रेसने तुमच्या विरोधात रचलेलं षडयंत्र मोडून काढायचं आहे. कर्नाटकमध्ये देखील काँग्रेसने हेच केलं, पण मी होऊ देणार नाही. त्यामुळे मोदीचे हात मजबूत करा ही मागणी घेऊन मी तुमच्याकडे आलोय. 


25 कोटी लोक गरिबीतून बाहेर पडले


एससी एसटी यांच्यापर्यंत योजना पोहोचवण्यासाठी आमचं सरकार शेवटच्या टोकापर्यंत जात आहेत. 25 कोटी गरीब हे गरिबीतून बाहेर आलेत. नियत बरोबर असेल तर निकाल पण बरोबर मिळतात. व्हायब्रंट भारत ही आमची योजना आहे, सीमेवर असलेले गावात वोटर जास्त नाहीत, पण मला त्यापेक्षा माझे देशाचे नागरिक मोठं आहेत.  गाव आणि शहरात दरी या काँग्रेसने निर्माण केली. काँग्रेससारखी माझी नजर फक्त व्होटबँक म्हणून असती तर कोट्यवधी रुपयांची योजना आणली नसती. काश्मीरमध्ये पहिल्यांदा एससी, एसटी, ओबीसी आरक्षणाचा फायदा मिळाला. 


ही बातमी वाचा: