सातारा : महायुतीच्या (Mahayuti) जागावाटपात अखेर साताऱ्याची भाजपला देण्यातआली असून उदयनराजे भोसलेंनी (Udayanraje Bhosale) उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हजर होते. उदयनराजेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) कोणाला उमेदवारी देण्यात येणार, याची चर्चा रंगली होती. त्यावर, शरद पवारांनी (Sharad Pawar) डाव टाकला अन् एकेकाळचे उदयनराजेंचे सहकारी शशिकांत शिंदे यांनाच लोकसभेच्या मैदानात उतरवले. गत 2019 च्या निवडणुकीत साताऱ्यातून माजी सनदी अधिकारी व शरद पवारांचे मित्र श्रीनिवास पाटील यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी, भरपावसात शरद पवारांनी सभा घेतली अन् साताऱ्यात चित्रच पालटलं.
साताऱ्यात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना पराभवाचा सामना करावा लागला होता. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शरद पवारांच्या पावसातील सभेमुळे वातावरण फिरले अन् श्रीनिवास पाटलांकडून उदयनराजेंचा पराभव झाला. मात्र, भाजपाने राज्यसभेवर संधी देत उदयनराजेंची सभागृहात वापसी केली होती. मात्र, श्रीनिवास पाटील यांच्याकडून झालेला पराभव उदयनराजेंच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळेच, यंदाच्या निवडणुकीत गत परभवाचा वचपा काढण्यासाठी उदयनराजे सज्ज झाले आहेत. त्यामुळेच, राष्ट्रवादीच्या खात्यात असलेली ही जागा भाजपला मिळवण्यासाठी उदयनराजेंनीही मोठा दबाव टाकला होता. विशेष म्हणजे, उमेदवारीची घोषणा होण्यापूर्वीच त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून प्रचाराला सुरुवातही केली होती. अखेर, त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता प्रचारांचा धडाका सुरू झाला आहे.
शशिकांत शिंदेंचे आव्हान
सातारा लोकसभा मतदारसंघात यंदा उदयनराजे शशिकांत शिंदे असा सामना रंगणार आहे. मात्र, येथील लढत थेट उदयनराजे विरुद्ध शरद पवार यांच्यातच असल्याची चर्चा मतदारसंघात आहे. यंदा विजयासाठी उदयनराजेंनी शड्डू ठोकला असून शशिकांत शिंदेंना जिंकवण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते प्रयत्न करणार आहे. मात्र, यंदा महायुती एकत्र असल्याने अजित पवारांची ताकदही उदयनराजेंसोबत असणार आहेत. त्यामुळे, पारंपारिक राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यात शरद पवारांना यंदा तगडे आव्हान आहे. त्यातच, उदयनराजेंनी शरद पवारांवर खोचक टीका केली आहे.
मानसपुत्र म्हणत टोला
उदयनराजेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मानसपुत्र म्हणत शरद पवारांना लक्ष्य केले. सातारा हा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जिल्हा, तर शरद पवार हे यशवंतराव चव्हाणांचे राजकीय वारसदार आणि मानसपुत्र मानले जातात.उदयनराजेंनी तोच धागा पकडून शरद पवारांना आव्हान दिलं. तसेच, बोचरी टीकाही केली.
पवारांना आव्हान
सातारा लोकसभा निवडणूक प्रचार दौरा अनुषंगाने आज पाटण तालुक्यातील मारूल हवेली विभागातील पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात पार पडला. मानसपुत्र म्हणणाऱ्यांचे नेतृत्व साडेतीन जिल्ह्यापुरते आहे, सातारा लोकसभा मतदार संघात 40 सभा घ्या, असे म्हणत उदयनराजेंनी शरद पवारांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केलीय. त्यामुळे, थेट शरद पवारांवरच हल्लाबोल केल्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून काय प्रत्युत्तर येते हे पाहावे लागेल.
हेही वाचा