बीड : राज्याच्या राजकारणात बीड लोकसभा (Beed Loksabha) मतदारसंघातील राजकीय सामन्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनीही या मतदारसंघात लक्ष घातले असून बजरंग सोनवणे (Bajrang Sonavane) यांना महाविकास आघाडीकडून मैदानात उतरवले आहे. त्यामुळे, पंकजा मुंडेंच्या पहिल्यात लोकसभा निवडणुकीत त्यांना गतवेळेसच्या बजरंग सोनवणे यांचे आव्हान असणार आहे. त्यातच, मराठा आरक्षणाचे केंद्रस्थान म्हणूनही सध्या बीडकडे पाहिले जाते. कारण, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे मूळ बीड जिल्ह्यातील असून निवडणूक काळातही ते बीड जिल्ह्यात दौरे करत आहेत. लोकसभा निवडणुकीत आपण उमेदवार देणार नाहीत, असे जरांगे यांनी जाहीर केले. मात्र, त्यांच्या खंद्या शिलेदाराने आता बीडमधून रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे, जरांगे पाटील काय भूमिका घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जाहीर सभेतून धनंजय मुंडेंनीही भाषण केलं. यावेळी, मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला स्पर्श करताना, त्यांनी बजरंग सोनवणे यांच्यावरही निशाणा साधला. सोनवणे यांनी कुणबी प्रमाणपत्र मिळवल्यावरुन त्यांनी विधान केलं होतं. त्यावर, सोनवणेंनीही पलटवार केला आहे. आता, उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनातील सहकारी असलेले गंगाधर काळकुटे यांनी बीड लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे, बीड लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात जरांगेंचा शिलेदारही मैदानात उतरल्याचं दिसून आहे. मात्र, जरांगे पाटील यांच्याशी भेटून अर्ज मागे घ्यायचा का नाही हे ठरवणार असल्याचं काळकुटे यांनी म्हटलं आहे. 


बीडच्या रणांगणात मराठा आरक्षणाचा मुद्दा


जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी असलेले सहकारी आणि बीडचे रहिवाशी गंगाधर काळकुटे यांनी बीड लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज उशिरा अर्ज भरला. बीडमध्ये प्रचाराच्या मु्द्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहेत. त्यामुळे, पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे हे दोन्ही उमेदवार मराठा आरक्षणा संदर्भातील भूमिका मांडतानाचे दिसून येते. त्यामुळेच, आपण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून व समाजाच्या हितासाठी निवडणूक लढत असल्याचं गंगाधर काळकुटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हटले. तसेच, या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन, चर्चा केल्यानंतरच अर्ज ठेवायचा की मागे घ्यायचा याचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


जरांगेंच्या भूमिके सर्वांचे लक्ष


गंगाधर काळकुटे हे मनोज डांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनातील अगदी जवळचे सहकारी आहेत. एकीकडे जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये आपण उमेदवार उभा करणार नसल्याची भूमिका घेतली. मात्र, गंगाधर काळकुटे यांनी बीडमधून उमेदवारी अर्ज भरल्याने मनोज जरांगे पाटील नेमका काय निर्णय घेतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जरांगे पाटील यांच्या भूमिकेकड बीडमधील मराठा समाज आणि महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बीड लोकसभा निवडणुकीमध्ये आज फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 99 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये अनेक उमेदवारांनी कुणी दोन-तीन असे फॉर्म भरलेले आहेत.


हेही वाचा


''पंकजा मुंडेंना पाडण्यासाठी षडयंत्र तर नाही ना?''; धनुभाऊंच्या भूमिकेवर संशय, प्रमाणपत्रावरुन विरेंद्र पवारांचा पलटवार