मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालातून महायुतीला दैदीप्यमान यश मिळाल्याने महायुतीचे स्पष्ट बहुमताचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर, नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तारही पार पडला. राज्य सरकारच्या 39 मंत्र्‍यांचा शपथविधी झाला, त्यामध्ये भाजपच्या 19, शिवसेना शिंदेंच्या 11 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) 9 आमदारांना मंत्रि‍पदाची संधी मिळाली. त्यामुळे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्‍यासह 42 मंत्र्‍यांचा शपथविधी संपन्न झाला असून अद्यापही 1 जागा शिल्लक आहे. मात्र, शपथविधीमध्ये मोठ्या प्रमाणात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याने जुने व वरिष्ठ नेते नाराज झाले आहेत. त्यात, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बड्या नेत्यांना मंत्रि‍पदाची संधी न दिल्याने आता उघडपणे नाराजी व्यक्त होत आहे. माजी मंत्री छगन भुजबळ यांनी ही नाराजी बोलून देखील दाखवली. तर, गत शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळातील (Minister) तब्बल 12 मंत्र्‍यांना फडणवीस सरकारमध्ये स्थान दिले नसल्याचे दिसून येते. 


शिवसेनेतील बंडानंतर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात महायुतीचं पहिलं सरकार स्थापन झालं. त्यामध्ये, शिवसेना शिंदेंच्या 9 मंत्र्‍यांचा शपथविधी झाला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेससह अजित पवार देखील महायुतीत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादीच्याही 9 आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली होती. पण, विधानसभा निवडणुकानंतर स्थापन झालेल्या फडणवीस सरकारमध्ये गत सरकारमधील 12 मंत्र्‍यांना डच्चू देण्यात आला आहे. त्यामध्ये, अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील 5, भाजपमधील 4 आणि शिवसेना शिंदे गटातील 3 नेत्यांचा समावेश आहे. भाजपमध्ये वरिष्ठ नेते आणि मंत्री राहिलेल्या सुधीर मुनगंटीवर व रविंद्र चव्हाण यांना मंत्रि‍पदातून वगळण्यात आले आहे. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासारख्या बड्या नेत्यांना मंत्रिपद नाकारले आहे. शिंदेंच्या शिवसेनेतही दीपक केसरकर व तानाजी सावंत यांसारख्या नेत्यांना मंत्रिपद देण्यात आलं नाही. 


12 नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू


शिंदे सरकारमधील 12 मंत्र्यांना वगळण्यात आले आहे. सर्वाधिक उलटफेर अजित पवार गटाने केला. यामध्ये ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (अजित पवार गट), दिलीप वळसे पाटील (अजित पवार गट), धर्मरावबाबा आत्राम (अजित पवार गट), अनिल भाईदास पाटील (अजित पवार गट) आणि संजय बनसोडे (अजित पवार गट), सुधीर मुनगंटीवार (भाजप), रवींद्र चव्हाण, सुरेश खाडे (भाजप), डॉ. विजयकुमार गावित (भाजप) आणि दीपक केसरकर (शिंदे गट), तानाजी सावंत (शिंदे गट), अब्दुल सत्तार (शिंदे गट) यांचा समावेश आहे.


छगन भुजबळांकडून नाराजी उघड 


छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांनी स्पष्ट शब्दात नाराजी उघड केली आहे. जरांगेंना अंगावर घेतल्याचं बक्षीस मला मिळालंय, असे म्हणत छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळात संधी न दिल्याबद्दल आपली भूमिका मांडली. दरम्यान, छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठविण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


हेही वाचा


मोठी बातमी ! रविंद्र चव्हाण अन् सुधीर मुनगंटीवारांचा पत्ता कट; फडणवीस सरकारमध्ये स्थान नाही