नागपूर : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आज नागपूर येथील राजभवनवर संपन्न झाला. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात आज 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामध्ये, 33 कॅबिनेट व 6 राज्यमंत्र्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वप्रथम शपथ घेतली, तर शिवसेना आमदार योगेश कदम यांनी सर्वात शेवटी शपथ घेतली. भाजपच्या (BJP) सर्वाधिक आमदारांचा शपथविधी झाला, त्यानंतर शिवसेना आणि अजित पवारांच्या पक्षाला संख्येने मंत्रिपद मिळाले आहेत. मात्र, भाजपच्या दोन वरिष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामध्ये, माजी मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra chavan) आणि सुधीर मुनगंटीवार यांची नावे आहेत.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज झालेल्या मंत्रिमंडळा विस्तारात भाजपच्या जुन्या व वरिष्ठ नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामध्ये, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, आशिष शेलार, पंकजा मुंडे बड्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, महायुती सरकारमध्ये महत्त्वाची खाती सांभाळेलल्या भाजप नेत्यांना संधी न मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. डोंबवलीतून चौथ्यांदा आमदार झालेले रविंद्र चव्हाण यांना मंत्रिपदाची संधी डावलण्यात आली आहे. तर, दुसरीकडे विदर्भातील भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना देखील फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय.
रविंद्र चव्हाणांना प्रदेशाध्यक्षपद, मुनगंटीवारांना काय?
रविंद्र चव्हाण हे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत, यंदा त्यांनी डोंबिवलीतून चौथ्यांदा विजय मिळवत विधानसभा गाठली आहे. तर, शिवसेनेतील बंडावेळीही त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली. तसेच, यापूर्वी दोनवेळेस त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली होती, शिवाय ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही जवळचे मानले जातात. त्यामुळे, त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, रविंद्र चव्हाण यांना भाजपकडून मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे समजते. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्याजागी रविंद्र चव्हाण यांना भाजपचे प्रदेशाध्यक्षपद देण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे, रविंद्र चव्हाण यांना पक्षात मोठं स्थान मिळत आहे, पण सुधीर मुनगंटीवार यांना संधी न देण्यामागे भाजपचं काय राजकारण आहे, याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सुधीर मुनगंटीवार हे देखील भाजपचे वरिष्ठ नेते असून यापूर्वी त्यांनी पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयाचा कामकाज सांभाळलेला आहे. त्यामुळे, भाजपने त्यांच्यासाठी काय योजना आखलीय हेही पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.
हेही वाचा
राणेंना संपवता संपवता...; मंत्रिपदाची शपथ घेताच राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल