Loksabha Election 2024: देशभरातील सर्वच पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. अशातच तृणमूल काँग्रेसनं आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाच्या यादीत एकूण 42 उमेदवारांची नावं आहेत. तृणमूल काँग्रेसच्या लोकप्रिय खासदार नुसरत जहा यांना मात्र पक्षाकडून आगामी निवडणुकीसाठी तिकीट नाकारण्यात आलं आहे. तसेच, दिग्गज क्रिकेटर युसूफ पठाणला बहरामपूरमधून तिकीट देण्यात आलं आहे. युसूफ पठाण काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. तर, बंगालच्या कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातून टीएमसीनं महुआ मोईत्रा यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.
नुसरत जहाँ यांचा पत्ता कट, तर शत्रुघ्न सिन्हा पुन्हा रिंगणात
तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी लोकसभेच्या 42 जागांसाठी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. यावेळी अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, आसनसोलमधून लोकसभेसाठी टीएमसीचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा असतील.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस एकट्यानं निवडणूक लढवणार असल्याची घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली. त्यासोबतच आसाम आणि मेघालयमध्येही निवडणूक लढवणार असल्याचं ममता बॅनर्जींनी जाहीर केलं होतं. तसेच, अखिलेश यादव यांच्याशी यूपीतील एका जागेवर निवडणूक लढवण्यासाठी चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
क्रिकेटर युसूफ पठाण लोकसभेच्या रिंगणात
तृणमूल काँग्रेसनं 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी माजी भारतीय क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना उमेदवारी दिली आहे. टीएमसीनं बहरामपूरमधून युसूफ पठाण यांना तिकीट दिलं आहे. युसूफ पठाण काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांच्या विरोधात लढतील. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधील बहरामपूरमधील निवडणूक चुरशीची होणार हे मात्र नक्की. महत्त्वाची बाब म्हणजे, तृणमूलनं ज्या मतदारसंघासाठी क्रिकेटर युसूफ पठाण यांचं नाव जाहीर केलं असलं तरी, अद्याप काँग्रेसनं मात्र त्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार, हे अद्याप जाहीर केलेलं नाही. पण, काँग्रेसकडून बहरामपूरची जागा अधीर रंजन चौधरीच लढणार असल्याच्या चर्चा बंगालच्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत.