Congress President Election: काँग्रेसच्या नवीन अध्यक्षाच्या निवडीबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) बैठक झाली. या बैठकीत निवडणुकीचा (Election) कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. याअंतर्गत 17 ऑक्टोबरला काँग्रेस अध्यक्षपदासाठी (Congress President) निवडणूक होणार असून, 19 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. याबाबत माहिती देताना काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल  (KC Venugopal) म्हणाले की, सीडब्ल्यूसीने सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेतली आणि अंतिम कार्यक्रमाला मंजुरी दिली.


त्यांनी सांगितले की, काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढू इच्छिणारे उमेदवार 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत आपलं नाव देऊ शकतात. त्याची निवडणूक 17 ऑक्टोबरला होणार असून मतमोजणी आणि निकाल 19 ऑक्टोबरला जाहीर होणार आहेत. काँग्रेसचे दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी अचानक राजीनामा दिल्यानंतर याच गदारोळात ही बैठक झाली.


बैठकीत अध्यक्षपदाच्या नावाची चर्चा झाली नाही 


याच बाबत बोलताना राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, बैठकीत काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांच्या नावावर चर्चा झाली नाही. अध्यक्षपदाची निवडणूक कधी होणार आणि त्यासाठी कोणती तयारी करावी लागेल, या विषयावर आम्ही चर्चा केली आहे. राहुल गांधींनी काँग्रेसचे अध्यक्ष व्हावे ही सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना आहे.




या बैठकीत पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते


काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) बैठक ऑनलाइन झाली. रविवारी दुपारी 3.30 वाजता सोनिया गांधी  (Sonia Gandhi) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. सध्या सोनिया गांधी वैद्यकीय तपासणीसाठी परदेशात आहेत. या बैठकीला त्यांच्यासोबत राहुल गांधी  (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधीही  (Priyanka Gandhi Vadra) उपस्थित होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी पक्षाध्यक्षपदाची (Party President) निवडणूक लढवण्यास तयार नाहीत. मात्र त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांकडून सातत्याने केले जात आहेत.


दरम्यान, भारत जोडो यात्रेच्या तयारीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस पक्षाने AICC महासचिव, पीसीसी अध्यक्ष ( PCC presidents)  आणि भारत जोडी यात्रेच्या राज्य समन्वयकांची (State Coordinators) 29 ऑगस्ट रोजी आयसीसी (AICC) मुख्यालयात बैठक बोलावली आहे. काँग्रेसची ही ऐतिहासिक पदयात्रा असेल, जी 7 सप्टेंबर 2022 रोजी कन्याकुमारी येथून सुरू होईल आणि जम्मू-काश्मीरमध्ये संपेल. तामिळनाडूतील ही यात्रा 7 ते 10 सप्टेंबर असे चार दिवस चालणार असून त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही पदयात्रा केरळमधून निघेल.