Eknath Shinde In Pune: पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा ताफा अडकल्यानंतर आता प्रशासन खडबडून जागे झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांची दखल आता मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी आज या पुलाची पाहणी देखील केली आहे. यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले आहेत की, परवा साताऱ्याकड जात असताना काही जणांनी मला चांदणी चौक वाहतूक कोंडीबद्दल सागितले. मी अधिकाऱ्यांना पाहणी करून ब्रिज तोडून काही काम करावं लागणार आहे, याबाबत बोललो. त्यामुळे वाहतूक कोंडी आता लवकरच सुटेल. येथे काही समस्या आहेत. ज्या शंभर टक्के सुटणार.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या ब्रिज काम होईपर्यंत उद्यापासूनच 100 वाहतूक कर्मचारी वाहतूक व्यवस्थित करण्यासाठी असतील. अवजड वाहतूक पण व्यवस्थित केली जाईल. कालच सर्व सूचना देऊन अॅक्शन करून काम होईल. ते म्हणाले की, पूर्वी काही झालं ते विसरून जा. उद्यापासून काम सुरू करून पुढच्या 15 दिवसात सगळं व्यवस्थित सुरू करू. युद्धपातळीवर काम करून प्रश्न सोडवू. हद्द वाद आता चांदणी चौकात येणार नाही. सगळे शहर एकमेकांना जोडली आहेत. पोलीस आणि प्रशासनाला आधी काम करा आणि मग हद्द बघा, आशा सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, मुंबई-बंगळुरू महामार्गावर दररोज अनेकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यात सगळ्यात महत्वाचा टप्पा जो पुण्यातील चांदणी चौकाकडे येतो त्या ठिकाणी वाहनांच्या मोठ्या रांगा असतात. त्यामुळे अनेक नागरीक गेले काही महिने या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त आहेत. यापुर्वी देखील पुणेकरांनी पुणे प्रशासनाकडे या वाहतूक कोंडीचं गाऱ्हाणं मांडलं होतं. मात्र याकडे प्रशासनाने लक्ष न दिल्याने पुणेकरांनी थेट मुख्यमंत्र्यांना गाठलं आहे. अशातच आता मुंबई- बंगळुरु महामार्गावरील चांदणी चौकातील पूल जमीनदोस्त केला जाणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ही माहिती जाहीर केली आहे. 12 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर दरम्यान हा पूल पाडला जाईल. हे काम सुरू करण्यापूर्वी वाहतुकीतील बदल जाहीर केले जाणार असल्याची माहिती देण्यात येणार आहे.
संबंधित बातमी:
Pune News : ... म्हणून चांदणी चौकातील पूल होणार जमीनदोस्त ; मुख्यमंत्री पुण्यातील चांदणी चौकाची स्वतः पाहणी करणार
Eknath Shinde In Pune: पुणेकरांनी अडवला मुख्यमंत्र्यांचा ताफा; चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचं गाऱ्हाणं थेट मुख्यमंत्र्यांकडे