Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Raigad रायगड: रायगड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून महायुतीच्या जिल्हयातील तीन जागांवर सध्या वाद सूरु आहे. कर्जतच्या जागेवरून महायुतीमध्ये अनेक वेळा वाद झाल्याचे समोर आले आहे. मात्र हा वाद आता पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे. कारण कर्जतच्या जागेवर आता राष्ट्रवादीने डोळा ठेवला आहे. काल पत्रकार परिषदेत स्वतः राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या मतदार संघात सुधाकर घारे इच्छुक आहेत, असं वक्तव्य करत सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे या जागेवर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असं विधान करत तटकरे यांनी यावर जास्त भाष्य करणे टाळले.
कर्जतमधून राष्ट्रवादीचे सुधाकर घारे हे इच्छुक आहेत आणि त्यांना सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचे पाठबळ असल्याचा चर्चा सध्या रायगडच्या राजकीय वर्तुळात रंगलेल्या पहायला मिळतं आहेत. त्यामुळे तिथे शिंदे गटाचे विद्यमान आमदार असलेले महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दूसरीकडे अलिबाग मुरुड मतदार संघात देखील भाजपचे दिलीप भोईर इच्छुक असल्याचे बोलले जातंय. त्यामुळे तिथे विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांना देखील महायुतीतील या वादाला सामोरे जाण्याची शक्यता आहे.
आदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदार संघाचा जर का महायुतीत सारं काही आलबेल झालं नाही. तर येणाऱ्या विधानसभेत आम्हीसुध्दा आमचा उमेदवार आदिती तटकरे यांच्या बालेकिल्ला असणाऱ्या श्रीवर्धन मतदार संघात उभा करू असा सूचक इशारा स्वतः शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी माणगाव मधील लोणेरे येथील एका कार्यक्रमात दिला होता. हीच वेळ रायगड जिल्हयातील या मतदार संघातून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सुनील तटकरे यांच्या या विधानावरून आता थोरवे विरूद्ध घारे यांच्या वादातील मास्टर माईंड कोण हे लवकरच उघड होण्याची शक्यता आहे.
रायगडमध्ये महायुतीतील सातही विधानसभा मतदार संघावर सध्या महायुतीचे आमदार आहेत.यामध्ये सार काही आलबेल नसलेले मतदार संघ हे पुढीलप्रमाणे-
1) कर्जत खोपोली खालापूर मतदार संघ
कोणाकोणात वाद - शिवसेना शिंदे गट (महेंद्र थोरवे) विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट (सुधाकर घारे)
2) अलिबाग मुरूड मतदार संघ
कोणाकोणात वाद - शिवसेना शिंदे गट (महेंद्र दळवी) विरुद्ध दिलीप भोईर (भाजप)
3) श्रीवर्धन मतदारसंघ-
श्रीवर्धन मतदारसंघावरवरील दोन्ही मतदार संघात आमच्यासोबत योग्य युतीचा धर्म पालन करणार नसाल तर या मतदार संघात शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर निवडणूकीत उभे करू अस सूतोवाच आमदार थोरवे यांनी सुनील तटकरे यांना दिले आहेत-
कोणाकोणात वाद - आदिती तटकरे (राष्ट्रवादी अजित पवार गट) विरुद्ध प्रमोद घोसाळकर - जि. प्रमूख रायगड शिंदे गट