बार्शी: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांमध्ये मनोज जरांगे यांनी आरक्षणाचा लढा उभारला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी अनेक भाजप आमदारांवर आणि नेत्यांवर आरक्षणाच्या मागणीवरून हल्लाबोल केला होता. त्यामध्ये बार्शीचे भाजपचे आमदार राजेंद्र राऊत यांचा देखील समावेश आहे, गेल्या काही दिवसांपासून राजेंद्र राऊत (MLA Rajendra Raut) आणि मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यात वाक् युध्द सुरू असल्याचं दिसून येत आहे. यादरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावं या मागणीसाठी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत (MLA Rajendra Raut) उद्यापासून (गुरूवारी) बेमुदत ठिय्या आंदोलनाला बसणार आहेत. 


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना रीतसर पत्र पाठवून राजेंद्र राऊत (MLA Rajendra Raut) यांनी विशेष अधिवेशन बोलावण्यासंदर्भात मागणी केली आहे. बार्शीच्या शिवसृष्टी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून राजेंद्र राऊत ठिय्या आंदोलन करणार आहेत. उद्यापासून सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत दररोज हे ठिय्या आंदोलन चालणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत झालेल्या वाकयुद्धामुळे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत (MLA Rajendra Raut) चर्चेत आले आहेत. आमदार राजेंद्र राऊत यांच्या ठिय्या आंदोलनाची राज्य सरकार दखल घेत का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


राजेंद्र राऊतांवर जरांगेंची टीका


गेल्या काही दिवसांपासून आमदार राजेंद्र राऊत (MLA Rajendra Raut) आणि मनोज जरांगे पाटील यांच्या वाकयुद्ध सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांची बाजू घेतल्यामुळे आमदार राजेंद्र राऊत यांनी एका तरुणाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. या मुद्द्यावरुन जरांगे पाटील यांनी राजेंद्र राऊत यांना इशारा दिला. ते रक्त सांडेल म्हटले. मला थेटला तर मी सोडत नाही. मराठ्यांच्या शक्तीपुढे कोणाची दादागिरी चालणार नाही, असे जरांगे पाटील यांनी म्हटले होते. मात्र, दिवसेंदिवस मनोज जरांगे पाटील आणि राजेंद्र राऊत यांच्यातील वाकयुद्धाला धार चढताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. तर राजेंद्र राऊत यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत जरांगे महाविकास आघाडीला मदत करत असल्याचा आरोप केला होता. 


मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी पुन्हा 17 सप्टेंबरपासून उपोषणाला बसणार


मनोज जरांगे हे येत्या 17 सप्टेंबरपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत. मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी मंगळवारी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना ही घोषणा केली. मनोज जरांगे यांनी याआधी आपण 29 सप्टेंबरला आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र, आता मनोज जरांगे हे 17 सप्टेंबरपासून आमरण उपोषण करणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवाली सराटीतील यापूर्वीच्या आंदोलनामुळे महायुती सरकारची कोंडी झाली होती. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे लोण राज्यभरात पसरले होते.