नागपूरः शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप इटकेलवार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याने अनेक इच्छुकांनी मुंबई गाठून नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. नागपूर शहरातही अंतर्गत धुसफूस आणि वाद सुरू असल्याने संपूर्ण कार्यकारिणीच बदलण्याची मागणी केली जात आहे.


नुकतेच शहरातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची रविभवनात बैठक घेण्यात आली. नागपूरचे संपर्क प्रमुख दुष्यंत चतुर्वेदी यांच्या नेतृत्वात घेण्यात आलेल्या बैठकीत मोठा वाद उफाळून आला होता. जिल्हा प्रमुखासोबत काही शिवसैनिकांची बाचाबाची झाली. दुसरीकडे या बैठकीला दुसरे जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया व शहर प्रमुख प्रवीण बरडे फिरकलेसुद्धा नाहीत. बरडे यांच्याकडून पूर्व नागपुरात विधानसभेची जबाबदारी काढून टाकण्यात आली आहे.


नागपुरात जसे चालू आहे, चालू द्या


हा वाद मुंबईत आधीच पोहोचला आहे. त्यामुळे परस्पर केलेल्या नियुक्त्या रद्द करण्याचे आश्वासन शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संदय राऊत यांनी नागपूरमध्येच दिले होते. मात्र, अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही. तसेच झालेच तर चतुर्वेदी आणि कुमेरिया गट दोघांचीही अडचण होणार आहे. शिवसेना आधीच अडचणीत आहे. अशा परिस्थितीत कार्यकारिणीत फेरबदल केल्यास शिंदे गट सक्रिय होईल या भीतीने जसे चालू आहे तसेच सुरू ठेवण्याचे धोरण नागपुरच्या बाबतीत पक्षाने ठेवले असल्याचे समजते.


सेना पदाधिकाऱ्यांना फोडण्याचे प्रयत्न


शिंदे गटामार्फत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना फोडण्याचे प्रयत्न सुरू आहे. मुंबईतून आलेल्या काही लोकांनी सर्वच पदाधिकाऱ्यांना ऑफर दिली आहे. मात्र शहरात त्यांच्या हाती कोणी ठोस पदाधिकारी लागला नाही. रामटेकचे खासदार कृपाल तुमाने आणि आमदार आशिष जयस्वाल अधिकृतपणे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे त्यांचे कट्टर समर्थक आपसूकच तिकडे वळले आहेत.


रामटेकमध्ये जाधव पुन्हा सक्रिय


रामटेकचे माजी खासदार व जिल्हा प्रमुख प्रकाश जाधव पुन्हा सक्रिय झाले असल्याचे समजते. ते मुंबईला जाऊन आले. काही नेत्यांच्या भेटीगाठी त्यांनी घेतल्या. ते कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. मात्र मध्यांतरी त्यांचीही जिल्हा प्रमुख पदावरुन गच्छंती करण्यात आली होती. त्यामुळे वर्षभरापासून ते शिवसेनेपासून दोन हात लांबच होते. सध्याच्या घडामोडी बघता मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात येऊ शकते हे लक्षात घेऊन ते कामाला लागले आहेत.