Raosaheb Danve : शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंना आयुष्यभर साथ देणार असल्याचे सांगितले होते, मात्र काल ते शिंदे गटात सामील झाले. शिवसंवाद यात्रेपर्यंत आदित्य ठाकरेंसोबत राहिले आणि आता त्यांनी ‘जय महाराष्ट्र ’ म्हटलं आहे. काल सकाळी त्यांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या प्रयत्नाने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी हातमिळवणी करून जुन्या तक्रारी दूर केल्या असल्याचं खुद्द दानवेंनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहे. तसेच कडू विषय आता पूर्णपणे संपले असल्याचं सांगत दानवेंनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. आणखी काय म्हणाले दानवे?
खोतकर- दानवेंनी एकमेकांच्या तोंडात साखर भरवली
रावसाहेब दानवे म्हणाले, खोतकर आणि दानवे यांची आज तब्बल दोन तास चर्चा झाली. यानंतर दानवेंनी एबीपी माझा सोबत संवाद साधलाय. ते म्हणाले, माझी काल एकनाथ शिंदे आणि खोतकरांशी भेट झाली, काही मतभेद असतील, त्यावर चर्चा झाली. मी अर्जुन खोतकरांच्या तोंडात साखर टाकली, खोतकरांनी माझ्या तोंडात साखर टाकली. आणि दोघांना पुष्पगुच्छ देऊन शिंदेंनी स्वागत केलंय. हा विषय कालच संपलेला आहे. कडू विषय पूर्णपणे संपले आहेत. लोकसभा हा भारतीय जनता पक्षाचा अधिकार आहे. 7 वेळा भाजप जिंकली, भविष्यातही भाजपच जिंकेल असा विश्वास यावेळी दानवेंनी व्यक्त केला. निवडणुकीनंतर पुन्हा भुकंप होत असतात, भुकंपानंतर पुन्हा स्थिर व्हावं लागत. मात्र आता ठरलंय, माझंही ठरलं, खोतकरांचंही ठरलं, अब्दुल सत्तारांचंही ठरलं आणि भुमरेंचंही ठरलं, आता जालन्यात आमचं सरकार नसताना २५ वर्षे जिल्हा परिषद ताब्यात ठेवली, आम्ही एकत्र आल्याने दुसरा कोणी जालन्यात शिरकाव करूच शकत नाही.
आताचा राजा एकनाथ शिंदेच - दानवे
दानवे यावेळी म्हणाले, तुम्ही भलेही बाळासाहेब ठाकरेंचे वंशज असाल, पण राजकीय वारस उद्धव ठाकरेच राहतील असा काही नियम नाही, बाळासाहेबांना आम्ही आदर्श राजा मानायचो, पण आता राजकारणामध्ये पोटातून जन्माला येत नाही, तो पिढीतून जन्माला येते. आताचा राजा हा एकनाथ शिंदे असून त्यांच्यामागे 50 आमदार आहेत. आणि उद्धव ठाकरेंच्या मागे केवळ 16 आमदार आहेत.
एकनाथ शिंदे यांनी मला आणि अर्जुन खोतकर यांना बोलावले होते- रावसाहेब दानवे
माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे देखील उपस्थित होते. यानंतर रावसाहेब दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी मला आणि अर्जुन खोतकर यांना बोलावले होते. मागचे वाद-विवाद सोडून द्या, असं सांगितलं. तसेच त्यानंतर मी आणि अर्जुन खोतकरांनी देखील सर्व विसरुन एकत्र काम करण्यास तयार असल्याचं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं असल्याचं ते म्हणाले.
खोतकर नेमकी काय भूमिका घेणार?
अर्जून खोतकर हे गेल्या दोन दिवसापासून दिल्लीत आहेत. अर्जुन खोतकर हे शिंदे गटात सामील झाल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. काल त्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याची देखील माहिती मिळत आहे. तसेच रावसाहेब दानवे यांची देखील खोतकरांनी काल भेट झाली होती. त्यानंतर आज पुन्हा दानवेंची खोतकरांनी भेट घेतली. तब्बल तासभर या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. सलग दुसऱ्या दिवशी या दोघांमध्ये चर्चा झाल्यानं खोतकर नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, आपण जालन्यात जाऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे अर्जून खोतकर यांनी सांगितले.
संकट असतील तर चेहऱ्यावर तणाव दिसू शकतो
माझ्यावर काही संकट असतील तर चेहऱ्यावर तणाव दिसू शकतो असेही अर्जुन खोतकर यांनी काल सांगितले. संकट असेल तर कोणाही व्यक्ती सेफ होण्याचा प्रयत्न करेल. नाही त्या गोष्टींमध्ये जर अडचणी निर्माण केल्या जात असतील तर तणाव दिसणारच असेही खोतकर म्हणाले. मी माझ्या निर्णयावर सविस्तर बोलणार आहे. उद्धव ठाकरे हे जर काही बोलत असतील तर त्यांचा तो अधिकार असल्याचे देखील खोतकर यावेळी म्हणाले. मी जालन्याला गेल्या माझी सविस्तरपणे भूमिका मांडणार असल्याचं त्यांनी सांगितले. माझ्या चेहऱ्यावर तणाव का आहे याची कारणं सर्वांनी माहित असल्याचे देखील खोतकर म्हणालेत.
जालन्यात जाऊन खोतकर आपली भूमिका जाहीर करणार
शिंदे यांच्या बंडानंतर अनेक शिवसेनेचे आमदार आणि खासदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडताना पाहायला मिळत आहे. त्यातच आता माजी आमदार आणि खासदार सुद्धा शिंदे गटाकडे वळत आहे. जालना जिल्ह्यातील महत्वाचे नेते आणि माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी सुद्धा आता शिंदे गटात प्रवेश केला असल्याची चर्चा आहे. ईडीच्या कारवाईमुळे खोतकर शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा होती. मात्र खोतकर यांनी या अफवा असल्याचा खुलासा केला होता. तर अजूनही आपण शिवसेनेत असून, फोटोवर अंदाज बांधू नका असे खोतकर म्हणाले होते. दरम्यान जालन्यात जाऊन खोतकर आपली भूमिका जाहीर करणार आहेत.