नागपूरः उद्धव ठाकरे यांना शिवसेना सांभाळता आली नाही. त्यांच्या लोकांना विश्वासात घेण्यात ते अपयशी ठरली. त्यामुळे आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडणे योग्य नाही. आणखी अधोगती होईल, उद्धव ठाकरे यांनी आत्मचिंतन करावे, त्यांना त्यांची चूक लक्षात येईल, असा सल्ला माजी उर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंना दिला.
खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केलेल्या आरोपाचा भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, भाजपने नेहमीच आपल्या मित्र पक्षाची काळजी घेतली, त्यांच्या पाठीशी उभा राहीला आहे. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी ते आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सर्वांनीच मित्रपक्षाला मदत केली. उद्धव ठाकरे यांना मदत केली तेव्हा भाजप पक्ष चांगला होता. आता त्यांच्या पायाखालील वाळू सरकल्याने भाजप त्यांना वाईट दिसत आहे, असेही आमदार बावनकुळे म्हणाले.
योग्य वागणूक दिली असती तर हे दिवस आले नसते
खासदार संजय राऊत यांच्या जाळ्यात अडकू नका, असा सल्ला देत आमदार बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे प्रकृती बरी नसल्याने अठरा महिने विधिमंडळात, मंत्रालयात नव्हते. आता असा कुठला डॉक्टर मिळाला की मास्कशिवाय फिरत आहेत. उद्धव ठाकरे यांनी निवडणुका घेण्याच्या आव्हानावरही बावनकुळे यांनी टिका केली. राष्ट्रवादी-कॉंग्रेससोबत गेले, तेव्हा का नाही निवडणूक घेण्याचे सुचले. निवडणुकीत जनतेला सामोरे जायला हवे होते, त्यानंतर राष्ट्रवादी-कॉंग्रेससोबत जायचे होते. आता शिवसेना, भाजप युतीत लढलेले आमदार एकत्र आले अन् जनतेचा जो कौल होता. त्यानुसार सरकार अस्तित्वात आले. हे सरकार प्रामाणिकपणे काम करित आहे. आमदारांना योग्य वागणूक दिली नाही. त्यामुळे त्यांनी त्यांचा निर्णय घेतला. त्यांना योग्य वागणूक दिली असती तर हे दिवस नसते आले. अडीच वर्षातील कारस्थानामुळे आमदार, खासदार कंटाळले अन् भाजपसोबत आले, असेही आमदार बावनकुळे म्हणाले.