MIM and Vanchit Bahujan Party Alliance: छत्रपती संभाजीनगर : राज्याच्या राजकारणात (Maharashtra News) आणखी एक नवीन समीकरण समोर येण्याची शक्यता आहे. 2019 प्रमाणे पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) आणि एमआयएमची (MIM) युती होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचं कारण म्हणजे, प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) युतीसाठी आमची दारं आजही उघडी आहेत, असं वक्तव्य एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी केलं आहे. विशेष म्हणजे, प्रकाश आंबेडकरांनी आमच्यासोबत एकत्रित येऊन नवं समीकरण तयार करावं, असंही इम्तियाज जलील म्हणाले आहेत.


याबाबत बोलताना जलील म्हणाले की, काहीतरी घडलं असेल त्यामुळे आमची युती तुटली. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत विचार करायला पाहिजे, अशी आमची अपेक्षा होती. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कुणी विचारही केला नसेल की, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन तुकडे होतील. कुणी विचारही केला नसेल की, काका पुतणे म्हणजेच, शरद पवार आणि अजित पवार वेगवेगळे होतील. अशा परिस्थितीत आमच्याकडे एक चांगला पर्याय होता आणि आहे. प्रकाश आंबेडकरांनी अजुनही विचार केला पाहिजे की, आम्ही अशा पद्धतीनं एक नवं समीकरण तयार करून अधिकाअधिक जागांवर विजय मिळवू शकतो. माझं मन,आमचे दरवाजे आणि सर्व काही प्रकाश आंबेडकरांसाठी आजीही खुले आहे. त्यांनी एकत्र यावेत आपण मिळून काहीतरी करू, असे इम्तियाज जलील म्हणाले आहेत.


सर्वसामान्य नागरिक घाणेरड्या राजकारणाला कंटाळलाय


पुढे बोलतांना जलील म्हणाले की, 'सर्वसामान्य माणूस या घाणेरड्या राजकारणामुळे वैतागला आहे. रात्री झोपताना एका पक्षात आणि सकाळी उठल्यावर दुसऱ्या पक्षात गेल्याचं कळतं. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकत्र आल्यास काही तरी करू असंही जलील म्हणाले.


पुन्हा 'जय मीम, जय भीम' पॅटर्न....


2019 च्या लोकसभा निवडणुकीत 'जय मीम, जय भीम'ची घोषणा करत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी एकत्रित आले होते. यावेळी असोद्दीन ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील अनेक भागात आपले उमेदवार लोकसभेच्या मैदानात उतरवले होते. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमधून इम्तियाज जलील यांच्या रूपाने या युतीने खातं उघडलं होतं. अनेक ठिकाणी दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर उमेदवारांनी मते मिळवली होती. पण, याचवेळी प्रकाश आंबेडकर यांचा अकोल्यातून पराभव झाला. पुढे ही युती तुटली आणि त्यानंतर हे दोन्ही पक्ष गेल्या पाच वर्षात एकदाही एकत्रित आले नाही.