Thane Election Meenakshi Shinde: कार्यकर्त्याची हकालपट्टी अन् मिनाक्षी शिंदे संतापल्या, एका क्षणात पदाचा राजीनामा भिरकावला, थेट शाखेत जाऊन बसल्या, ठाण्यात नेमकं काय घडलं?
Thane Election Meenakshi Shinde Resgination: मिनाक्षी शिंदे संतापल्या, एका क्षणात पदाचा राजीनामा भिरकावला, ठाण्यात नेमकं काय घडलं? इच्छा व्यक्त करणं गुन्हा नाही, मिनाक्षी शिंदेंनी राजीनामा का दिला?

Thane Election Meenakshi Shinde Resgination: ठाणे महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना गुरुवारी रात्री ठाण्यातील शिंदे गटाच्या महिला आघाडी प्रमुख आणि माजी महापौर मिनाक्षी शिंदे (Meenakshi Shinde) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ उडाली होती. मिनाक्षी शिंदे यांचे समर्थक विक्रांत वायचळ यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे मिनाक्षी शिंदे (Meenakshi Shinde) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर मिनाक्षी शिंदे काल ठाण्यातील शिवसेनेच्या (Shivsena) शाखेत जाऊन बसल्या होत्या. याठिकाणी मोठ्या संख्येने जमलेल्या महिला शिवसैनिकांनी मीनाक्षी शिंदे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पक्षातून हकालपट्टी झालेले विक्रांत वायचळ हेदेखील त्यांच्यासमवेत होते. यावेळी मिनाक्षी शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या मनातील सगळी खदखद बाहेर काढली. (Thane Latest news)
मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे. आता पुढील निर्णय एकनाथ शिंदे साहेबांशी बोलून घेईन. तोपर्यंत मी राजीनाम्याबाबत आणखी काही बोलू शकत नाही. माझ्या राजीनाम्याने ठाण्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीवर कोणताही परिणाम होणार नाही. मी पदाचा राजीनामा दिला असला तरी शिवसेनेसोबतच आहे, मी शिवसेनेचीच कार्यकर्ता राहीन, असे मिनाक्षी शिंदे यांनी स्पष्ट केले. मात्र, त्यांनी विक्रांत वायचळ यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली.
आमच्या एका कार्यकर्त्याचा राजीनामा घेण्यात आला. हे करण्यापूर्वी मला कळवण्यात आले असते तर मी भूमिका घेतली असती. प्रत्येक कार्यकर्त्याला निवडणुकीला उभे राहावे असे वाटते. त्याने तशी इच्छा व्यक्त करणे हा गुन्हा नाही. एखाद्या कार्यकर्त्याने तिकीट मागितल्यानंतर पक्षश्रेष्ठींना मान्य असेल तर ते तिकीट देतात. पण कोणी अपेक्षा व्यक्त केली म्हणून त्या कार्यकर्त्याचा राजीनामा घेणे चूक आहे. एखाद्याने पक्षाला गालबोट लावणारे काम केले तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण नुसती इच्छा व्यक्त केली म्हणून कारवाई होणे हे चूक आहे. मी ज्या प्रभागाचे नेतृत्व करते, त्याची पालक म्हणून जबाबदारी माझी आहे. कोणी माझ्या मुलाला त्रास देत असेल आणि मला त्याला वाचवता येत नसेल तर आई म्हणून पहिला राजीनामा माझा घेतला गेला पाहिजे. मी त्याला वाचवू शकत नसेन तर मी प्रभागाला काय वाचवणार? मी असमर्थ ठरते. त्यामुळे पहिला राजीनामा माझा झाला पाहिजे, अशी भूमिका मिनाक्षी शिंदे यांनी मांडली. त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे मिनाक्षी शिंदे यांच्याशी चर्चा करणार का आणि या बैठकीत काय तोडगा काढला जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Thane Mahangarpalika Election 2026: मिनाक्षी शिंदेंनी राजीनामा का दिला, ठाण्यात नेमकं काय घडलं?
ठाण्यातील भूषण भुईरे या माजी नगरसेवकाला पुन्हा तिकीट मिळू नये यासाठी काही शाखाप्रमुखांनी आंदोलन केलं होतं. त्यामध्ये विक्रांत वायचळ यांचा समावेश होता. विक्रांत वायचळ हे मिनाक्षी शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जातात. शाखाप्रमुखांच्या आंदोलनानंतर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत प्रभाग क्रमांक 3 मनोरमा नगरचे शाखाप्रमुख विक्रांत वायचळ यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. ही हकालपट्टी झाल्यानंतर शिवसेनेत नाराजीनाट्य रंगल्याचं चित्र आहे.
आणखी वाचा
पुण्यात भाजपकडून शिंदे गटाला फक्त 12 जागांची ऑफर, शिवसेनेचा महायुतीमधून बाहेर पडण्याचा इशारा
























